Jyoti Malhotra : पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपांमुळे सध्या चर्चेत असलेली युट्यूबर ज्योती मल्होत्रा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. २०२३ मध्ये ती झारखंड राज्यातील प्रसिद्ध शिवधाम बासुकीनाथ येथे दर्शनासाठी आली होती, अशी माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, बाबा भोलेनाथ यांची आरती करतानाचा तिचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
बासुकीनाथ धामला फौजदारी बाबांचा दरबार म्हणूनही ओळखले जाते, हे झारखंडमधील एक प्रमुख धार्मिक स्थळ असून ते "कामना लिंग" म्हणून प्रसिद्ध आहे. श्रावण महिन्यात या ठिकाणी बिहार, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेशसह देशभरातून तसेच नेपाळ-भूतानसारख्या शेजारील देशांतून लाखो भाविक दर्शनासाठी येतात.
झारखंडचं प्रसिद्ध देवस्थान
झारखंड सरकारने या मंदिराला मोठा दर्जा दिला आहे. स्थानिक मान्यतेनुसार, जो कोणी देवघरच्या बाबा बैद्यनाथ मंदिराला भेट देतो, त्याच्या इच्छा तोपर्यंत पूर्ण होत नाहीत, जोपर्यंत तो बासुकीनाथमध्ये फौजदारी बाबांना नमन करत नाही. म्हणूनच या दोन तीर्थक्षेत्रांना दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाची उपमा दिली जाते.
श्रावण महिन्यात भरतो मेळावा!
ज्योती मल्होत्रा श्रावण महिन्यात या धार्मिक स्थळी का आली होती, याबाबत तपास यंत्रणा आता अधिक सखोल चौकशी करत आहेत. विशेष म्हणजे या काळात बासुकीनाथ परिसरात मोठ्या प्रमाणावर सुरक्षा दल तैनात असते. इतर राज्यांतूनही सुरक्षा कर्मचारी येथे पाठवले जातात. श्रावण महिन्यातील श्रावणी मेळा आणि त्यानंतर भाद्रपद महिन्यातील भादो मेळा हे दोन प्रमुख धार्मिक कार्यक्रम येथे पार पडतात.
दरम्यान, बिहारच्या सुलतानगंज येथून कवडीया भाविक गंगेचे पवित्र पाणी कवडीत भरून १०५ किलोमीटरचा पायी प्रवास करत देवघरच्या ज्योतिर्लिंग आणि त्यानंतर बासुकीनाथला पोहोचतात. अशा धार्मिक पावित्र्याच्या वातावरणात ज्योती मल्होत्रा कशासाठी आली होती, हे अजूनही अनुत्तरित असून, सुरक्षा यंत्रणांचे लक्ष यावर केंद्रित झाले आहे. तिच्या या भेटीचा उद्देश धार्मिक होता की अन्य काही, यावर आता तपास सुरू आहे.