गोव्यातील अरपोरा येथील 'बर्च बाय रोमियो लेन' नाइटक्लबला लागलेल्या भीषण आगीत २५ जणांचा दुर्दैवी बळी घेतल्यानंतर थायलंडला पळून गेलेल्या सौरभ आणि गौरव लूथरा या मुख्य आरोपींना अटक करून भारतात परत आणण्याची प्रक्रिया आता अधिक तीव्र झाली आहे. भारत सरकारने थायलंड सरकारकडे लूथरा बंधूंना अटक करण्याची आणि त्यांना भारतात प्रत्यार्पित करण्याची औपचारिक विनंती केली होती, यानुसार मोठी कारवाई करण्यात आली आहे.
थायलंड पोलिसांनी लुथरा बंधूंना फुकेतमधून ताब्यात घेतले आहे. ७ डिसेंबरच्या मध्यरात्री क्लबला आग लागली आणि घटनेच्या काही तासांतच, ७ डिसेंबरच्या पहाटे ५:३० वाजता लूथरा बंधूंनी इंडिगोच्या विमानाने थायलंडमधील फुकेत येथे पळ काढला होता.
गोव्यातील या संवेदनशील घटनेमुळे राज्याच्या आणि केंद्राच्या दबावानंतर प्रशासकीय यंत्रणांनी तातडीने कठोर पाऊले उचलली आहेत. लूथरा बंधूंचा आंतरराष्ट्रीय प्रवास थांबवण्यासाठी भारत सरकारने त्यांचे पासपोर्ट रद्द केले आहेत. यामुळे ते थायलंडबाहेर प्रवास करू शकणार नाहीत. इंटरपोलद्वारे त्यांच्याविरुद्ध 'ब्लू कॉर्नर नोटीस' जारी करण्यात आली होती.
कोर्टात अर्ज फेटाळलाअटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी लूथरा बंधूंनी दिल्लीतील रोहिणी कोर्टात 'ट्रान्झिट अग्रिम जामीन' अर्ज केला होता, पण न्यायालयाने त्यांना तातडीने कोणताही दिलासा देण्यास नकार दिला आहे.
प्रत्यार्पणाची प्रक्रिया
भारत आणि थायलंडमध्ये २००३ पासून प्रत्यार्पण संधी लागू आहे. या संधीचा आधार घेत भारत सरकारने फुकेतमधील थायलंडच्या अधिकाऱ्यांकडे लूथरा बंधूंना अटक करण्याची विनंती केली होती. भारतीय एजन्सीज थाई अधिकाऱ्यांशी सतत संपर्कात आहेत. लवकरात लवकर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून लूथरा बंधूंना भारतात आणले जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.