गडचिरोली : छत्तीसगडमधील गारियाबंद जिल्ह्यातील जंगलात ११ सप्टेंबर रोजी सुरक्षा दल व माओवाद्यांमध्ये भीषण चकमक झाली. आठ तासांच्या या धुमश्चक्रीत सुरक्षा दलाने १० माओवाद्यांना ठार केले आहे. यामध्ये एक कोटीचे बक्षीस असलेला जहाल माओवादी व केंद्रीसय समिती सदस्य मोडेम बाल कृष्णा उर्फ बालन्ना मनोज उर्फ रामचंद्र, उर्फ राजेंद्र ,उर्फ भास्कर, उर्फ गोलकोंडा राजेंद्र उर्फ चिन्नी (६१) याचा समावेश आहे.
पोलिस सूत्रांनुसार, आंध्रप्रदेश व ओडिशा राज्याच्या सीमेलगत छत्तीसगडमधील गारियाबंद जिल्ह्याच्या जंगलात माओवादविरोधी मोहीम सुरु होती. ११ सप्टेंबरला पहाटे दबा धरून बसलेल्या माओवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्याला सुरक्षा दलाने तडाखेबंद प्रत्युत्तर दिले. तब्बल आठ तास चाललेल्या या चकमकीत १० माओवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा यंत्रणेला यश आले. अद्याप काही माओवादी जंगलात दडून बसले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून अधूनमधून गोळीबार सुरू आहे.शस्त्रसाठा, कागदपत्रे जप्त
रायपूर परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक अमरेश मिश्रा यांनी या कारवाईला दुजोरा दिला. घटनास्थळावरून शस्त्रसाठा, साहित्य आणि कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. परिसरात शोधमोहीम सुरू असून नक्षलविरोधी कारवाई आणखी तीव्र केली जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.छत्तीसगडसह, महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात होता सक्रिय
या चकमकीत ठार झालेला नक्षलवादी कमांडर मनोज हा बराच काळ छत्तीसगड व शेजारील महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात सक्रिय होता. त्याच्या नेतृत्वाखाली अनेक हिंसक घटना घडल्या होत्या. त्याच्यावर शासनाने एक कोटी रुपयांचे इनाम जाहीर केले होते. इतर माओवाद्यांची ओळख पटविण्याचे काम सुरु होते, अद्याप या भागात माओवादविरोधी मोहीम सुरुच असल्याचे सूत्रांनी सांगितले.चळवळीत सांभाळल्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या
माओवादी नेता मोडेम बालकृष्णा उर्फ बालन्ना उर्फ मनोज हा मूळचा तेलंगणातील माडीकोंडा , घानपूर (जि. वारंगल) येथील रहिवासी होता.वडिलांचे नाव वेंकटराय्या होते. इंटरमिजिएट पर्यंत शिक्षण घेतलेला मनोज वयाच्या विशीमध्येच माओवादी चळवळीत आला. तो माओवादी संघटनेतील एक महत्त्वाचा कॅडर मानला जातो. बीजीएन डीव्हीसी सचिव,ओडिशा स्टेट इंचार्ज, सेंट्रल रिजनल ब्युरो मेंबर व सध्या केंद्रीय समिती सदस्य म्हणून त्याच्यावर जबाबदारी होती. ए.के.–४७ रायफल सोबत बाळगत फिरणाऱ्या मनोजचा अनेक हिंसक कारवायांत सहभाग होता.‘चलपती’चा खात्मा केला तेथेच ‘मनोज’लाही टिपलेछत्तीसगड, महाराष्ट्र, आंध्र प्रदेशासह तेलंगाणापर्यंत अनेक नक्षली कारवायांचा म्होरक्या प्रताप रेड्डी रामचंद्र रेड्डी उर्फ चलपती हा एक कोटीचे बक्षीस असलेल्या माओवादी नेत्याला छत्तीसगडच्या गारियाबंद जंगलात जानेवारी २०२५ मध्ये जवानांनी ठार केले होते. त्याच जंगलात ११ सप्टेंबरला जहाल नेता मोडेम बालकृष्णा उर्फ बालन्ना उर्फ मनोज याचा खात्मा करण्यात आला. आठ महिन्यांत दोन जहाल नेत्यांना एकाच जंगलात संपविल्याने सुरक्षा जवानांचे हे मोठे यश मानले जात आहे.