National Security Advisory Board: पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या अगदी एका आठवड्यानंतर, मंगळवारी संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक उच्चस्तरीय बैठक घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानविरुद्ध कारवाई करण्यासाठी लष्कराला मोकळीक दिल्याचे म्हटलं जात आहे. त्यानंतर आता केंद्र सरकारने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाची पुनर्रचना केली आहे. रिसर्च अॅण्ड अॅनालिसिस विंगचे माजी प्रमुख आलोक जोशी यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या मंडळात आणखी सहा सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कॅबिनेट सुरक्षा समितीची बैठक घेतल्यानंतर सरकारने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाची पुनर्रचना केली आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे अध्यक्ष म्हणून माजी रॉ प्रमुख आलोक जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. माजी वेस्टर्न एअर कमांडर एअर मार्शल पी.एम. सिन्हा, माजी दक्षिणी लष्कर कमांडर लेफ्टनंट जनरल ए.के. सिंग आणि रिअर अॅडमिरल मोंटी खन्ना हे लष्करी सेवेतील निवृत्त अधिकारी आहेत. राजीव रंजन वर्मा आणि मनमोहन सिंग हे भारतीय पोलिस सेवेतील दोन निवृत्त सदस्य आहेत. सात सदस्यांच्या मंडळात बी. वेंकटेश वर्मा हे निवृत्त आयएफएस आहेत.