मध्य प्रदेशमधील भोपाळ येथे एका कथित लव्ह जिहाद प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणातील आरोपींना भोपाळमधील कुणीतरी कुख्यात गुंड आर्थिक मदत करत असल्याचेही उघड झाले आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेले आरोपी फरहान, अली आणि साद हे तिघेही सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी असतानाही आलिशान जीवन जगत होते. त्यातील फरहानकडे तब्बल ३ लाख रुपये किंमत असलेली स्पोर्ट्स बाईक होती. तर अली याला महागड्या घड्यांळांचा शौक होता. तसेत आरोपी पीडित तरुणींना महागड्या हॉटेलमध्ये घेऊन जायचे, असेही तपासामधून उघड झाले आहे.
एवढंच नाही तर यातील एक आरोपी फरहान याच्याकडे करण्यात आलेल्या चौकशीमधून आणखीनच धक्कादायक माहिती समोर आली आहे. ''मी कुठलंही चुकीचं काम केलेलं नाही, उलट मी जे काही केलं ते पुण्याचं काम होतं. अधिकाधिक हिंदू मुलींवर बलात्कार करणं हेच माझं लक्ष्य होतं’’, असा दावा या आरोपीने केल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही संपूर्ण टोळी लव्ह जिहादच्या उद्देशाने हिंदू तरुणींना लक्ष्य करून त्यांच्यावर बलात्कार करत असे. या प्रकरणी शनिवारी राष्ट्रीय महिला आयोगाची टीम भोपाळ येथे पोहोचणार आहे. तसेच बलात्कार आणि ब्लॅकमेलिंग प्रकरणी चौकशी करणार आहे.
दरम्यान, एका पीडित तरुणीने पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला. हे सर्व आरोपी आधी हिंदू तरुणीशी मैत्री करायचे. मग बाहेर भेटायला बोलवायचे. त्यानंतर प्रेम आणि लग्नाचं आमिष दाखवून त्यांच्यावर बलात्कार करायचे आणि त्याचं चित्रिकरण करायचे. असा व्हिडीओ तयार केल्यानंतर आता तुझ्या मैत्रिणींसोबतही आमची मैत्री करून दे म्हणून पीडित मुलींवर दबाव आणायचे. त्याशिवाय आरोपी तरुणी पीडित मुलींवर आपल्या इतर मित्रांसोबत शरीरसंबंध प्रस्थापित करण्यासाठीही दबाव आणायचे.