मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. कार कालव्यात कोसळली, ज्यामुळे कारमधून प्रवास करणाऱ्या एअर होस्टेसचा मृत्यू झाला. २१ वर्षीय एअर होस्टेस तिच्या मित्रमैत्रिणींसोबत फिरायला गेली होती तेव्हा भीषण अपघात झाला. या घटनेनंतर पोलिसांनी गाडी चालवणाऱ्या मित्रावर निष्काळजीपणे गाडी चालवल्याबद्दल गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
कोलार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ वर्षीय हर्षिता ही एअर होस्टेस होती. गुरुवारी रात्री हर्षिता तिचे मित्र-मैत्रीण जय आणि सुजल यांच्यासोबत फिरायला गेली होती. कोलार सिक्स लेनवरील होली क्रॉस स्कूलजवळ अचानक एक गाय रस्त्यावर आली. यावेळी कारचा वेग जास्त होता. जय गाडी चालवत होता, त्याला गाडीवर नियंत्रण ठेवता आलं नाही आणि कार रस्त्याच्या कडेला वाहणाऱ्या कालव्यात पडली.
जय आणि सुजल यांनी कसं तरी हर्षिताला गाडीतून बाहेर काढलं आणि उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात नेलं. रुग्णालयाने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. यादरम्यान, हर्षिताच्या मैत्रिणीने तिच्या कुटुंबाला अपघाताची माहिती दिली. कुटुंबातील सदस्य रुग्णालयात पोहोचले तेव्हा डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की हर्षिताचं ब्रेनडेड झालं आहे. शुक्रवारी तिला मृत घोषित करण्यात आलं.
हर्षिताने बुधवारी तिच्या वडिलांशी फोनवर चर्चा केली होती. तिने सांगितलं होतं की, ती शुक्रवारी तिच्या भावाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी भोपाळला येत आहे, परंतु कुटुंबातील सदस्यांना न सांगताच हर्षिता गुरुवारीच भोपाळला पोहोचली आणि एका हॉटेलमध्ये रुम बुक करून तिथेच राहिली. तिच्या मित्र-मैत्रिणींनी तिला येथून पिक केलं आणि फिरायला गेले, याच दरम्यान हा अपघात झाला. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.