अमेरिकेने जगावर लादलेल्या ट्रेड वॉरच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे डी वेंस हे सपत्निक भारत दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्यासोबत तीन मुलेही आहेत. त्यांचे विमान आज सकाळी १० वाजता दिल्लीच्या पालम विमानतळावर उतरले. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी त्यांचे स्वागत केले.
वेंस निळ्या सुटमध्ये तर त्यांची भारतीय वंशाची पत्नी उषा या नारिंगी रंगाच्या ड्रेसमध्ये एकमेकांच्या हातात हातघालून विमानातून खाली उतरले. तर त्यांच्या मुलांनी भारतीय कुर्ता पायजमा घातला होता. तिथून ते थेट अक्षरधाम मंदिरात गेले आहेत. आज सायंकाळी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार आहेत.
वेंस हे चार दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत. भारत आणि अमेरिकेमध्ये व्यापार करार होण्याची शक्यता आहे. यामुळे भारताला ट्रम्प यांच्या ट्रेड वॉरपासून आपला बचाव करता येणार आहे. मोदींची भेट झाल्यानंतर २२ एप्रिलला वेंस कुटुंबीय जयपूरला जाणार आहेत. तिथे आमेर किल्ला, अन्य ऐतिहासिक वास्तूंना भेट देणार आहेत. सायंकाळी ते राजस्थानमध्ये एका छोटेखानी सभेला संबोधित करणार आहेत. यामध्ये राजनयिक, धोरण तज्ञ आणि सरकारी अधिकारी यांचा समावेश असणार आहे.
२३ एपिलला ते आग्र्याला जाणार आहेत. तिथे ते ताजमहल, शिल्पग्रामला भेट देणार आहेत. पुन्हा ते जयपूरला येणार आहेत. यानंतर २४ एप्रिलला सकाळी साडे सहा वाजता ते अमेरिकेला जाण्यास निघणार आहेत.
भारताशी नाते काय...जेडी वेंस यांची पत्नी उषा या भारतीय वंशाच्या आहेत. त्या मुळच्या आंध्र प्रदेशच्या आहेत. उषा या पेशाने वकील आहेत. उषाचे आईवडील पश्चिम गोदावरी आणि कृष्णा जिल्ह्यातील तेलुगू ब्राह्मण आहेत. उषा यांचे आजोबा, चिलुकुरी रामा शास्त्री, आयआयटी मद्रासमध्ये भौतिकशास्त्र शिकवायचे. आता ही संस्था त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ विद्यार्थी पुरस्कार चालवते.