दिल्लीउच्च न्यायालयाने एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान अत्यंत महत्त्वाची टिप्पणी करत, लग्नाचे आश्वासन देत शारीरिक संबंध प्रस्थापित करणे आणि नंतर 'कुंडली' जुळत नसल्याचा बहाणा करून लग्नास नकार देणे हा गुन्हा ठरू शकतो. अशा प्रकरणांत भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ६९ अंतर्गत खटला चालवला जाऊ शकतो, असे म्हटले आहे. हे कलम 'फसवणुकीद्वारे प्रस्थापित केलेल्या लैंगिक संबंधांना' गुन्ह्याच्या कक्षेत ठेवते. न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा यांच्या खंडपीठासमोर अशाच एका प्रकरणावरून आरोपीच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू होती.
संबंधित आरोपीवर एका महिलेशी शारीरिक संबंध ठेवल्यानंतर लग्नास नकार दिल्याचा आरोप आहे. आरोपी ४ जानेवारीपासून न्यायालयीन कोठडीत आहे. दरम्यान, हा संबंध परस्पर संमतीने होता आणि आम्ही एकमेकांना आठ वर्षांपासून ओळखतो, असा युक्तीवाद आरोपीने केला होता. मात्र तो न्यायालयाने फेटाळून लावला.न्यायालयाला आढळून आले की, आरोपीने कुंडली जुळण्यासह लग्नात कोणताही अडथळा येणार नाही, असे आश्वासन पीडितेस दिले होते. पीडितेने नोव्हेंबर २०२५ मध्ये प्रथम तक्रार केली होती, परंतु आरोपीच्या कुटुंबाने लग्नाचे पक्के आश्वासन दिल्यानंतर तिने तक्रार मागे घेतली. मात्र तरीही, नंतर पुन्हा कुंडली जुळत नसल्याचे कारण सांगत लग्नास नकार देण्यात आला. जानेवारी २०२६ मध्ये याप्रकरणी भादंवि कलम ३७६ (बलात्कार) आणि भारतीय न्याय संहिता कलम ६९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला -न्यायमूर्ती शर्मा म्हणाल्या, "केवळ नाते तुटल्यामुळे फौजदारी कायदा लागू करता येत नाही, परंतु हे प्रकरण वेगळे आहे. आधी लग्नाचे आश्वासन देणे आणि नंतर कुंडलीचे कारण पुढे करून माघार घेणे हे गुन्ह्याच्या श्रेणीत येते." आरोपीला जर त्याच्या कुटुंबाच्या कुंडलीबाबतच्या अटी ठाऊक होत्या, तर त्याने खोटा शब्द द्यायला नको होता, असे ताशेरे ओढत न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज फेटाळून लावला.
Web Summary : Delhi HC: Promising marriage, engaging in relations, then citing 'Kundali' issues to refuse is a crime. BNS Section 69 applies to deceitful sexual relationships. Accused denied bail after false promises and subsequent rejection.
Web Summary : दिल्ली हाईकोर्ट: शादी का वादा करके शारीरिक संबंध बनाना, फिर 'कुंडली' का हवाला देकर इनकार करना अपराध है। भारतीय न्याय संहिता की धारा 69 धोखे से बने यौन संबंधों पर लागू होती है। झूठे वादों के बाद इनकार करने पर आरोपी को जमानत नहीं।