बंगळुरू - संपूर्ण कुटुंब आनंदात होते. कारमध्ये गाणी सुरू होती. प्रत्येकजण आपापसात हसत होते, मस्करी करत होते. नव्या वॉल्वो एक्ससी ९० लग्झरी कारमधून कुटुंब क्रिसमसच्या सुट्टीत एकत्र गावी चाललं होते. गावी पोहचण्यासाठी काही तास शिल्लक होते परंतु त्यांच्या वाटेतच मृत्यू उभा होता याची कल्पनाही कुणी केली नसेल. एका क्षणात सर्वकाही होत्याचं नव्हतं झालं आणि संपूर्ण कुटुंब मृत्यूच्या दाढेत ओढले गेले. बंगळुरू येथील एका सॉफ्टवेअर कंपनीचे सीईओ आणि त्यांच्या कुटुंबातील ५ जणांचा जागीच मृत्यू झाल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त होत आहे.
राष्ट्रीय महामार्ग ४८ वर ही दुर्घटना घडली. हे कुटुंब लग्झरी वॉल्वो कारमधून प्रवास करत होते. सीईओ स्वत: कार चालवत होते. बंगळुरू शहराच्या हद्दीतील नेलमंगलाजवळ त्यांच्या जवळून जाणारी स्पोर्ट युटिलिटी व्हेइकल (एसयूव्ही) कारवर उलटली. कारमध्ये बसलेल्या सहाही जणांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात इतका भयंकर होता की पाहणाऱ्याच्या अंगावर काटा आला. कारचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला त्यामुळे आत बसलेल्या मृतदेह अडकले. हे मृतदेह छिनविछिन्न अवस्थेत होते. कारमधून मृतदेह बाहेर काढण्यासाठी कटरचा वापर करावा लागला.
मृतांमध्ये आयएसटी सॉफ्टवेअर सॉल्यूशंसचे एमडी आणि सीईओ चंद्रम येगापगोळ, त्यांची पत्नी गौराबाई, १६ वर्षीय मुलगा ज्ञान, १२ वर्षीय मुलगी दीक्षा, येगापगोळ यांच्या वहिणी विजयलक्ष्मी आणि त्यांची ६ वर्षीय मुलगी आर्या यांचा समावेश आहे. येगापगोळ कुटुंब त्यांच्या महाराष्ट्रातील सांगली गावी यायला निघाले होते. त्यांची कार बंगळुरू तुमाकुरू येथील टीप्पागोंडानहल्लीजवळ पोहचली तेव्हा हा भीषण अपघात झाला. चंद्रम हे जबाबदारीने गाडी चालवत होते त्यांची काही चूक नव्हती असं पोलिसांनी सांगितले.
तुमाकुरूच्या दिशेने जाणारी एसयूव्ही एका दुधाच्या ट्रकच्या मागे जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने अचानक नियंत्रण गमावले आणि तो ट्रक मधल्या लेनमधून वळला आणि दुसऱ्या लेनमध्ये पडला. कंटेनर ट्रकने दुधाच्या ट्रकला धडक दिली आणि दोन्ही वाहने पलटी झाली. हा अपघात पाहून धक्का बसलेल्या येगापगोळ यांनी आपल्या कारचा वेग कमी केला परंतु कंटेनर ट्रक थेट त्यांच्या व्होल्वोच्या वर जाऊन उलटला. या भयानक दुर्घटनेत कंटेनर ट्रक चालक आणि दूध ट्रक चालक गंभीर जखमी झालेत. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.