दिल्लीत विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर आता आम आदमी पार्टी (आप) कंबर कसून कामाला लागली आहे. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री तथा आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी यापूर्वी महिलांसाठी 2100 रुपये देण्याची घोषणा केली होती. यानंतर आता बुधवारी केजरीवाल यांनी संजीवनी योजना जाहीर केली आहे. या योजनेची घोषणा करताना केजरीवाल म्हणाले, आम्ही वृद्धांचा अत्यंत आदर करतो. आपणच आम्हाला इथपर्यंत पोहोचवले आहे. 60 वर्षांवरील सर्व वृद्ध व्यक्ती या सुविधेचा लाभ घेऊ शकतील.
अरविंद केजरीवाल म्हणाले, “या योजनेंतर्गत प्रत्येकाला सरकारी अथवा खाजगी रुग्णालयात मोफत उपचार घेता येतील. सरकार स्थापन होताच, दिल्ली सरकार ही योजना पास करून वृद्धांच्या आरोग्याची काळजी घेईल. या बदल्यात दिल्लीतील सर्व वृद्धांकडून अपेक्षा आहे की, ते मतदानाच्या दिवशी आशीर्वाद स्वरुपात आम आदमी पक्षाला समर्थन करतील.
"आमचे सरकार गरीब-श्रीमंत, असा भेद करणार नाही" -केजरीवाल पुढे म्हणाले, "आमचे सरकार गरीब आणि श्रीमंत असा भेद करणार नाही. सर्वांवर मोफत उपचार केले जातील. वृद्धांची नोंदणी लवकरच सुरू केली जाईल आणि लवकरच सर्वांना आय-कार्ड देखील दिले जातील."
यापूर्वी महिलांसाठी करण्यात आली होती घोषणा -अरविंद केजरीवाल यांनी यापूर्वी 12 डिसेंबररोजी महिलांसाठी 'महिला सन्मान योजना' जाहीर केली होती. या योजनेंतर्गत पात्र महिलांच्या खात्यावर दरमहा एक हजार रुपये वर्ग करण्याची घोषणा करण्यात आली होती. यानंतर, निवडणूक जिंकल्यानंतर महिलांना 1000 ऐवजी 2100 रुपये दिले जातील, अशी घोषणा केली.