इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धविराम घडवून आणण्यासाठी पाकिस्तान सध्या मध्यस्थी करत असून स्वतःला 'शांतीदूत' म्हणून मिरवत आहे. मात्र, पाकिस्तानच्या या नव्या अवतारावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शशी थरूर यांनी जोरदार टीका केली आहे. "पाकिस्तान आज जरी शांततेच्या गप्पा मारत असला, तरी त्यांच्या भूतकाळातील काळ्या कारनाम्यांमुळे त्यांचे पाप कधीही धुवून निघणार नाही," अशा शब्दांत थरूर यांनी पाकिस्तानला आरसा दाखवला आहे.
२६/११ आणि दहशतवादी तळांची आठवण
इस्लामाबादमध्ये आज (११ एप्रिल) होणाऱ्या ऐतिहासिक बैठकीच्या पार्श्वभूमीवर थरूर यांनी पाकिस्तानच्या दुटप्पी भूमिकेवर निशाणा साधला. ते म्हणाले की, "पाकिस्तान आज स्वतःला शांतता प्रस्थापित करणारा देश म्हणवून घेत आहे, पण २६/११ चा मुंबई हल्ला आम्ही विसरलो नाही. आजही पाकिस्तानात दहशतवादी प्रशिक्षण शिबिरे सुरू आहेत. एकाही दहशतवाद्यावर त्यांनी आजवर कारवाई केलेली नाही." यावेळी त्यांनी पहलगाम येथील हल्ल्याचाही उल्लेख केला, ज्यामध्ये २६ निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागला होता.
'आम्ही जुनी संस्कृती, मोठे मन दाखवावे'
पाकिस्तानच्या भूमिकेवर टीका करतानाच थरूर यांनी भारताच्या भूमिकेबद्दलही भाष्य केले. "इराण, अमेरिका आणि इस्रायलमधील युद्ध थांबणे हे भारताच्या हिताचेच आहे. शांतता कोणीही आणो, मग तो पाकिस्तान असो वा अन्य कोणी, आपल्याला शांतता हवी आहे. आपण एक जुनी आणि महान संस्कृती आहोत, त्यामुळे भारताने या परिस्थितीत रचनात्मक भूमिका बजावून मोठे मन दाखवायला हवे," असे आवाहन त्यांनी केले.
शहबाज शरीफ यांचे 'ते' ट्विट वॉशिंग्टनने लिहिले?
पाकिस्तानच्या मध्यस्थीवर शंका उपस्थित करताना थरूर यांनी एक खळबळजनक दावा केला. ते म्हणाले की, "पाकिस्तान आणि अमेरिकेचे संबंध सर्वांना ठाऊक आहेत. वॉशिंग्टनने पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ यांना एक ट्विट लिहून दिले होते, जे त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले." तसेच, इराणमध्ये युद्ध वाढले तर निर्वासित लोक ९०० किमीची सीमा ओलांडून पाकिस्तानातच येतील, या भीतीपोटी पाकिस्तान ही धडपड करत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
Web Summary : Shashi Tharoor criticized Pakistan's peacemaking efforts, citing past actions like the 26/11 attacks and ongoing terrorist camps. He suggested the US influenced Pakistan's stance, urging India to play a constructive role in fostering peace, despite Pakistan's involvement.
Web Summary : शशि थरूर ने पाकिस्तान के शांति प्रयासों की आलोचना की, 26/11 के हमलों और आतंकी शिविरों जैसे अतीत के कृत्यों का हवाला दिया। उन्होंने सुझाव दिया कि अमेरिका ने पाकिस्तान के रुख को प्रभावित किया, और भारत से पाकिस्तान की भागीदारी के बावजूद शांति को बढ़ावा देने में रचनात्मक भूमिका निभाने का आग्रह किया।