रायपूर - छत्तीसगडच्या नारायणपूर येथे सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत २७ नक्षली ठार झालेत. या चकमकीत सुरक्षा जवानांनी नक्षली संघटनेचे महासचिव नंवबल्ला केशव राव उर्फ बसवराजू याचा खात्मा केल्याचे पुढे आले आहे. अद्यापही चकमक सुरू असल्याचे सांगितले जाते.
नंवबल्ला केशव राव उर्फ बसवराजू कोण?
बसवराजू मागील ३५ वर्षापासून नक्षलवादी चळवळीतील संघटनेत केंद्रीय कमिटी सदस्य होता. त्याच्यावर दीड कोटीचे बक्षीस जाहीर होते. तो श्रीकाकुलम जिल्ह्यातील जियन्नापेटा गावातील रहिवासी होता. त्याचे वय ७० च्या आसपास होते. बसवराजू नोव्हेंबर २०१८ पासून सीपीआय या संघटनेचा महासचिव होता.
नेहमी हातात असायची AK-47
बसवराजूच्या हाती नेहमी एके ४७ असायची. तो छत्तीसगड, आंध्रप्रदेश, तेलंगणा आणि महाराष्ट्रात सक्रीय होता. सरकारने त्याच्यावर दीड कोटीचे बक्षीस जाहीर केले होते. बसवराजू २४ वर्षापासून पोलित ब्यूरो सदस्य म्हणून काम करत होता. त्याने पक्षात केंद्रीय सैन्य आयोगाचा प्रभारी म्हणून काम केले आहे.
इंजिनिअर होता बसवराजू
बसवराजूने वारंगल येथून इंजिनिअरींगचं शिक्षण घेतले होते. त्याने रिजनल इंजिनिअरींग कॉलेज वारंगल येथून बीटेक केले. लोक त्याला नंवबल्ला केशव राव गनगन्ना, विजय, दरपू नरसिम्हा रेड्डी, प्रकाश कृष्णा या नावानेही ओळखत होते. १९७० साली तो घर सोडून नक्षलवादी चळवळीत सहभागी झाला होता.
यु्द्धकलेत पारंगत होता
बसवराजू युद्धकलेतही पारंगत होता. गणपतीनंतर बसवूराज २०१८ पासून संघटनेत महासचिव म्हणून जबाबदारी सांभाळत होता. तो संघटनेत बहुतांशवेळा सैन्य कमान हाती घ्यायचा. बसवराजू सैन्य कमान सांभाळणे, आक्रमक हल्ले करण्यासाठी प्रसिद्ध होता. हल्ल्याची रणनीती आखण्यातही बसवराजू माहीर होता.
दरम्यान, छत्तीसगडच्या नारायणपूर- बीजापूर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात सुरक्षा दल आणि नक्षलवादी यांच्यात जोरदार चकमक झाली. त्यात २७ नक्षली मारले गेले. मात्र या कारवाईत एक जवान शहीद झाला. छत्तीसगडमध्ये सातत्याने नक्षलीविरोधात अभियान सुरू आहे. ७ दिवसांआधीही तेलंगणा बॉर्डरवर कर्रेगुट्टा डोंगराळ भागात सुरक्षा दलाने २४ दिवस चाललेल्या ऑपरेशनमध्ये ३१ नक्षलवाद्यांना ठार केले. ज्यात १६ महिला, १५ पुरुष नक्षलींचा सहभाग होता.
मार्च २०२६ पर्यंत नक्षलवादी चळवळ संपवणार
केंद्र सरकारकडून सातत्याने मार्च २०२६ पर्यंत नक्षलवाद पूर्णत: संपवणार असल्याचा इशारा दिला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने देशातून नक्षलवाद उखडून टाकण्याचा संकल्प घेतल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे. ३१ मार्च २०२६ पर्यंत भारत नक्षलमुक्त होईल असं आश्वासन शाह यांनी दिले आहे.