प्राणप्रतिष्ठेला महिना पूर्ण, अयोध्येत भाविकांचा महासागर; ३० दिवसांत ६२ लाख जणांचे रामदर्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2024 07:17 PM2024-02-22T19:17:22+5:302024-02-22T19:19:55+5:30
Ayodhya Ram Mandir: राम मंदिराच्या दुसऱ्या मजल्याचे बांधकाम सुरू झाले असून, येथे सात देवतांची स्थापना केली जाणार आहे.
Ayodhya Ram Mandir: बालरुपातील रामलला दर्शन घेण्यासाठी अयोध्येत लाखोंच्या संख्येने भाविक येत आहेत. दररोज लाखो भक्त रामदर्शन घेत आहेत. तर दानधर्मही मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेल्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला आता जवळपास एक महिना झाला आहे. गेल्या महिन्याभरात सुमारे ६२ लाख भाविकांनी अयोध्येत येऊन रामदर्शन घेतल्याचे सांगितले जात आहे.
अयोध्या रामनगरीत ही भक्ती, ज्ञान आणि कर्माचा त्रिवेणी संगम पाहायला मिळत आहे. भव्य आणि दिव्य राम मंदिरात श्रीरामांचे दर्शन घेण्यासाठी भक्तांचा महासागर लोटत आहे. आस्था ट्रेनमधून दररोज जवळपास १० ते १५ हजार भाविक अयोध्येत पोहोचत आहेत. भाविकांना अनेक किलोमीटर पायी प्रवास करत राम मंदिराकडे जावे लागत आहे. अजूनही अनेक सुविधांची अभाव आहे. असे असूनही भाविकांचा रामदर्शनाचा उत्साह तसूभरही कमी होताना दिसत नाही.
भाविकांमध्ये अभूतपूर्व उत्साह आहे
अयोध्येत येणाऱ्या भाविकांचा उत्साह अगदी पाहण्यासारखा आहे. गर्दी कमी होऊन मग रामदर्शनासाठी जाऊ, अशी वाट भाविक पाहताना दिसत नाहीत. रामललाचे दर्शन घेण्यासाठी देश-विदेशातून भाविक येत आहेत. सर्वांना रामदर्शनाची उत्सुकता आहे. अयोध्येतील राम मंदिर इतर मंदिरांच्या तुलनेत कसे आहे, हे पाहण्यासाठीही लोक दर्शनासाठी येत आहेत. भाविकांना दोन ते तीन किलोमीटर पायी चालत यावे लागत आहे. असे असले तरी त्यांच्या चेहऱ्यावर थकवा दिसत नाही. दर्शन घेताच चेहऱ्यावरील आनंद अवर्णनीय असतो. रामललाचे दर्शन घेतल्यानंतर ज्येष्ठांच्या डोळ्यात पाणी तरळते. आनंदाश्रूंसह ते बाहेर येतात. भाविकांमध्ये अभूतपूर्व उत्साह आहे, अशी प्रतिक्रिया श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सदस्य डॉ.अनिल मिश्रा यांनी दिली आहे.
दरम्यान, २३ जानेवारी रोजी एकाच दिवशी सर्वाधिक भाविकांनी रामदर्शन घेतले होते. राम मंदिराच्या पहिल्या मजल्यावरील कामे जवळपास पूर्ण झाली असून, आता दुसऱ्या मजल्याचे काम सुरू झाले आहे. संपूर्ण मंदिर तीन टप्प्यात पूर्ण होणार आहे. यानंतर राम मंदिराचे भव्य रूप समोर येईल. राम मंदिराची प्रदक्षिणा करण्यासाठीचा मार्ग गोलाकार करण्यात आला आहे. दुसऱ्या मजल्यावर सात देवतांची स्थापना केली जाणार आहेत. ज्यामध्ये श्रीविष्णू, शिव, ब्रह्मा, गणेश, हनुमान, माता दुर्गा आणि सरस्वती यांच्या मूर्ती स्थापन करण्यात येणार आहेत. यासोबतच भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणारे नक्षीकामही पाहायला मिळणार आहे. सध्या मंदिरात एक मुख्य शिखर आणि पाच उपशिखर बांधण्यात येणार आहेत. मुख्य शिखराचे बांधकाम डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.