Hyderabad Crime:तेलंगणाच्या हैदराबादमध्ये धावत्या ट्रेनमध्ये तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न करण्यात आला. स्वत:ला वाचवण्यासाठी तरुणीने चालत्या ट्रेनमधून उडी मारली. धावत्या ट्रेनमधून पडल्याने तरुणी जबर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संपूर्ण कोचमध्ये एकट्या असलेल्या तरुणीला पाहून आरोपीने तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर घाबरलेल्या तरुणीने जीव वाचवण्यासाठी ट्रेनमधून उडी मारली. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ मार्च रोजी रात्री ८.१५ च्या सुमारास कोमपल्लीजवळ ही घटना घडली. हैदराबादच्या सिकंदराबाद रेल्वे स्थानकावरून मेडचलला जाणाऱ्या एमएमटीएस ट्रेनच्या महिला डब्यात २० वर्षीय तरुणी एकटीच प्रवास करत असताना हा प्रकार घडला. तरुणीने पोलिसांना सांगितले की, डब्यातून प्रवास करणाऱ्या दोन महिला प्रवासी अलवल रेल्वे स्थानकावर ट्रेनमधून उतरल्या. त्यानंतर डब्यात मी एकटाच प्रवासी होते. त्यावेळी २५ वर्षांचा एक अज्ञात व्यक्ती माझ्याजवळ आला आणि घाणेरडे कृत्य करू लागला. तिने नकार दिल्यावर त्याने तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. स्वत:ला वाचवण्यासाठी मी चालत्या ट्रेनमधून उडी मारली, असं पीडित तरुणीने सांगितले.
रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणीच्या डोक्याला, उजव्या हाताला आणि कमरेला जखमा झाल्या आहेत. पीडितेच्या तक्रारीच्या आधारे भारतीय न्याय संहितेच्या कलम ७५ आणि १३१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून आरोपींना पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
"ट्रेनमध्ये एका पुरूषाने २० वर्षांच्या मुलीवर हल्ला केला. स्वतःचे रक्षण करण्यासाठी तिने चालत्या ट्रेनमधून उडी मारली. तिला दुखापत झाली असून तिच्यावर गांधी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि आरोपींचा शोध घेण्यासाठी चार विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत," अशी माहिती हैदराबाद पोलीस अधीक्षक चंदना दीप्ती यांनी दिली.
दरम्यान, फेब्रुवारी महिन्यात तामिळनाडूच्या वेल्लोर जिल्ह्यातील कटपाडीजवळ एका ३६ वर्षीय गर्भवती महिलेला चालत्या ट्रेनमधून बाहेर ढकलून देण्यात आलं होतं. या घटनेत ती गंभीर जखमी झाली होती.