नवी दिल्ली - केंद्र सरकारच्या तीन कृषी विधेयकाविरुद्ध पंजाब आणि हरियाणातील शेतकरी आक्रमक झाले असून गेल्या 23 दिवसांपासून दिल्लीच्या सीमारेषेवर त्यांचं आंदोनल सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांना आश्वास्त केलं आहे, पण ठोस निर्णय झाल्याशिवाय माघार घेणार नसल्याचं या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. एकीकडे शेतकरी आंदोनलाचा 24 वा दिवस उजाडला असतानाचा पतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीतील रकाबगंज येथील गुरुद्वाराला भेट दिली.
नरेंद्र मोदींनी दिल्लीतील रकाबगंज येथील गुरुद्वारात जाऊन शीख समुदायाचे 9 वे गुरू तेग बहादूर यांना नमन केले. गुरू तेग बहादूर यांच्या सर्वोच्च बलिदानासाठी त्यांना श्रद्धांजली वाहिली. मोदींचा आजचा गुरुद्वाराचा दौरा अचानक ठरल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे. मोदींच्या गुरुद्वारा भेटीचं कुठलंही नियोजन नव्हता, विशेष म्हणजे मंदिर व्यवस्थापनालाही यासंदर्भात काहीही कल्पना नव्हती. त्यामुळे, मोदींच्या या दौऱ्यावर चर्चेला उधाण आलं आहे.
एकीकडे केंद्र सरकारने तिन्ही कृषी कायदे परत घेतले नाहीत, तर येत्या गणतंत्र दिवशी राजपथचे नाव बदलून कृषिपथ करण्यात येईल, असा इशारा शेतकरी नेते राकेश टिकेत यांनी दिला आहे, सरकारला सद्बुद्धी येवो म्हणून शेतकऱ्यांनी सामूहिक प्रार्थना केली. त्यातच, मोदींनी गुरुद्वाराला भेट दिल्याने विरोधकांकडून टीकाही करण्यात येत आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे युवकचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी ट्विटरवरुन मोदींच्या गुरुद्वारा भेटीला नाटकं असल्याचं म्हटलंय. शेतकरी आंदोलन सुरू असताना हा दौरा म्हणजे डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न असल्याचं त्यांनी म्हटलंय.
29 शेतकऱ्यांचा मृत्यू
शेतकरी आंदोलनात आतापर्यंत विविध कारणांनी 29 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यात सिंघू, टिकरी सीमेशिवाय हरियाणा आणि पंजाबमधील शेतकऱ्यांचा समावेश आहे. त्या सगळ्यांना श्रद्धांजली देण्यासाठी सिंघू सीमेवर शनिवारी सकाळी 9 ते 11 पर्यंत पूजा करण्यात आली.