अलाहाबाद, दि. 6 - उत्तर प्रदेशमध्ये दहशतवादविरोधी पथकानं एका दहशतवाद्याला बेड्या ठोकल्या आहेत. उत्तर प्रदेशच्या एटीएसने मुझफ्फरनगरमध्ये ही कारवाई करत बांगलादेशी दहशतवाद्याला गजाआड केले. या बांगलादेशी दहशतवाद्याचा दहशतवादी कारवायांत हात असल्याचा संशय दहशतवादविरोधी पथकाला होता. त्यामुळे एटीएस त्याच्या मागावर होते. महिन्याभरापासून तो मुझफ्फरनगरमध्ये वास्तव्याला होता. त्याआधी 2011पासून तो सहारनपूर राहत होता. अब्दुल्लाह असे त्याचे नाव असून, आता तो तुरुंगात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तो दहशतवादी बनावट आधार कार्ड आणि पासपोर्टच्या आधारे भारतात वास्तव्याला होता. उत्तर प्रदेश एटीएसचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक ब्रजेश श्रीवास्तव यांच्या नेतृत्वाखालील टीमनं कारवाई करत त्याला बेड्या ठोकल्या. अब्दुल्लाह हा दहशतवादी बनावट ओळखपत्राच्या आधारे बांगलादेशी दहशतवाद्यांना पासपोर्ट काढून देत होता. त्याचबरोबर त्यांना भारतात राहण्यास मदत करत होता, असे त्याने चौकशीत सांगितले आहे.बांगलादेशात बंदी घातलेल्या ‘अन्सरुल्ला बांगला’ या दहशतवादी संघटनेचा तो दहशतवादी आहे. पोलिसांनी त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात बनावट ओळखपत्रं, पैसे, स्वत:चे बनावट पासपोर्ट आणि आधार कार्ड जप्त करत ताब्यात घेतले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी भारतात पारपत्र कायद्याचे उल्लंघन करून बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या रासेल शेख (२८) याच्यासह आठ जणांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभाग पथकाने ठाणे आणि पनवेलमधून अटक केली होती. त्यांना 14 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले होते. त्यांच्याकडे भारतीय पॅन कार्ड आणि आधार कार्ड आढळल्याने त्यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला होता.ठाण्याच्या कोपरी भागात रासेल शेख हा बांगलादेशी वास्तव्य करीत असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौडकर यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे त्यांच्या पथकाने 12 मार्च रोजी कोपरीमध्ये कारवाई करून त्याला ताब्यात घेतले. तो मूळचा बांगलादेशी असून, त्याच्याकडे भारतात वास्तव्याची कोणतीही अधिकृत कागदपत्रे नव्हती. त्याच्याकडील सखोल चौकशीत त्याचे आणखी नातेवाईक रायगड जिल्ह्यातील पनवेलमधील कोपरा गाव येथे वास्तव्याला असल्याचे त्याने सांगितले.
यूपीत बांगलादेशी दहशतवाद्याला एटीएसनं ठोकल्या बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2017 13:00 IST