नवी दिल्लीः तिहेरी तलाक या विधेयकाला काल राज्यसभेत मंजुरी देण्यात आली आहे. जवळपास साडेचार तासांच्या पदीर्घ चर्चेनंतर 99 विरुद्ध 84 अशा मतांनी राज्यसभेने हे विधेयक मंजूर केले. त्यानंतर या विधेयकावर विरोधकांनी टीका केली आहे. या ऐतिहासिक निर्णयावर एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसींनी प्रश्न उपस्थित केले आहेत.ते म्हणाले, मुस्लिम महिलांविरोधात हा अन्याय आहे. तिहेरी तलाक विधेयक हा ऐतिहासिक निर्णय नाही. तीन तलाक हा गुन्हाच आहे. पण केंद्र सरकारनं जे विधेयक मंजूर केलं आहे, त्यामुळे मुस्लिम महिलांच्या अडचणीत वाढ होणार आहे. तीन तलाक कायदा हा एका वर्गाला डोळ्यांसमोर ठेवून बनवण्यात आला आहे. तो सर्वोच्च न्यायालयात टिकणार नाही. सरकारनं मुस्लिम पतीला तुरुंगात डांबलं तरी ही कुप्रथा संपणार नाही. सर्वोच्च न्यायालयानं पॉक्सो अॅक्ट प्रकरणातील निवाड्यासाठी 500 न्यायालयं बनवली, तरीही 9 टक्के प्रकरण अजूनही कायद्याच्या कचाट्यात अडकलेली आहे. भाजपा या विधेयकाला ऐतिहासिक बोलून मुस्लिम महिलांसाठी खोटे अश्रू काढत आहेत. भाजपाला मुस्लिम महिलांची एवढीच चिंता आहे, तर उन्नाव हिंदू बलात्कार पीडितेच्या प्रकरणात ते गप्प का आहेत, असा प्रश्नही ओवैसींनी उपस्थित केला आहे.
तिहेरी तलाक विधेयकावर असदुद्दीन ओवैसी म्हणतात...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2019 09:08 IST