नवी दिल्ली : भाजप नेते नितीन गडकरी यांनी दाखल केलेल्या मानहानी खटल्याप्रकरणी जामिनासाठीची जातमुचलक्याची रक्कम भरण्यास नकार देणारे आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल अखेर नरमले़ दिल्ली उच्च न्यायालयाने तिखट शब्दांत फटकारल्यानंतर केजरीवाल आज मंगळवारी जातमुचलका भरण्यास राजी झाले़ दहा हजार रुपयांचा जातमुचलका व हमीपत्र सादर केल्यानंतर दिल्लीच्या एका न्यायालयाने त्यांना तिहार तुरुंगातून सोडण्याचे आदेश दिले़ तत्पूर्वी दिल्ली उच्च न्यायालयाने केजरीवालांना चांगलेच फटकारत जामिनाचा मुद्दा प्रतिष्ठेचा न करता हमीपत्र भरण्याचा सल्ला दिला़ जातमुचलक्याची रक्कम भरण्यास नकार दिल्यामुळे महान्यायदंडाधिकारी न्यायालयाने केजरीवाल यांची गत २१ मे रोजी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती़ दुसर्या सुनावणीतही केजरीवालांनी जामीन घेण्यास नकार दिल्याने, त्यांना ६ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती़ केजरीवाल यांनी या निर्णयाला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले होते़ उच्च न्यायालयाच्या न्या़ कैलाश गंभीर व न्या़ सुनीता गुप्ता यांच्या खंडपीठाने संबंधित याचिकेवर सुनावणी करताना केजरीवालांना चांगलेच फटकारले़ केजरीवालांनी कायदेशीर प्रक्रियेला प्रतिष्ठेचा मुद्दा बनवू नये़ आधी त्यांनी जातमुचलका भरावा़ त्यांनी उपस्थित केलेल्या कायदेशीर पैलूंवर नंतरही विचार केला जाऊ शकतो, असे न्यायालयाने बजावले़ यानंतर केजरीवालांनी जातमुचलक्याची रक्कम भरण्याची तयारी दर्शवीत स्वहस्ताक्षरातील हमीपत्र कनिष्ठ न्यायालयास सादर केले़ (लोकमत न्यूज नेटवर्क)
केजरीवालांचे ‘जेल पॉलिटिक्स’ संपुष्टात
By admin | Updated: May 28, 2014 03:16 IST