(Image Credit : Rajya Sabha TV)
भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री अरूण जेटली यांनी २४ ऑगस्टला दुपारी १२ वाजून ७ मिनिटांनी शेवटचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते नवी दिल्ली येथील एम्स हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. त्यांची स्थिती इतकी बिघडली होती की, त्यांनी यावेळी आरोग्याच्या कारणामुळे नरेंद्र मोदींच्या कॅबिनेटमध्ये सहभागी होण्यास नकार दिला होता.
६७ वर्षीय अरूण जेटली यांना सॉफ्ट टिश्यू सरकोमा नावाच्या कॅन्सरने ग्रासले होते. असेही सांगितले जाते की, यामुळेच त्यांना श्वास घेण्यासही अडचण येत होती. काही वर्षांपूर्वी ते एका वेगळ्याच सर्जरीमुळे फार चर्चेत आले होते. डायबिटीसने पीडित जेटली यांनी हार्ट सर्जरी आणि लठ्ठपणापासून सुटका मिळवण्यासाठी बॅरिअॅट्रिक सर्जरी केली होती. आणि त्यावेळी लठ्ठपणा दूर करणाऱ्या या सर्जरीमुळे फारच चर्चेत आले होते. मात्र, ही बॅरिअॅट्रिक सर्जरी काय असते हे कदाचित फार लोकांना माहीत नाही. चला तर जाणून घेऊ काय आहे ही सर्जरी.
काय आहे बॅरिअॅट्रिक सर्जरी?
वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आहेत. पण त्यातील सर्वात सोपी पद्धत मानली जाते बॅरिअॅट्रिक सर्जरी. माजी अर्थमंत्री अरूण जेटली यांनी त्यांचं वजन कमी करण्यासाठी या सर्जरीचा आधार घेतला होता. ही सर्जरी तीन प्रकारची असते. लॅप बॅंड, स्लीव गॅस्ट्रिक्टोमी आणि गॅस्ट्रिक बायपास सर्जरी. ही सर्जरी लेप्रोस्कोपिक पद्धतीने केली जाते. लॅप बॅंड सर्जरीनंतर व्यक्तीची खाण्याची क्षमता फार कमी होते.
स्लीव गॅस्ट्रिक्टोमीनंतर व्यक्तीचं दर आठवड्याला दीड ते दोन किलो वजन कमी होऊ लागतं. १२ ते १३ महिन्यात ८० ते ८५ टक्के वजन याने कमी होतं. नंतर गॅस्ट्रिक बायपास करून जठर विभागून बॉलच्या आकाराचं करून सोडून दिलं जातं. या सर्जरीमुळे अन्न उशीरा पचन होतं. भूक वाढवणारा 'ग्रेहलीन' हार्मोनही तयार होणं बंद होतं. अशात शरीरातील जमा चरबी ऊर्जेच्या रूपात खर्च होऊ लागते आणि वजन वेगाने कमी होऊ लागतं.
ही एक अशी प्रक्रिया आहे ज्यात वजन वाढवणारे हार्मोन्स हटवले जातात. जेणेकरून व्यक्तीचं वजन सामान्य गतीने कमी व्हावं. बॅरिअॅट्रिक सर्जरीनंतर व्यक्तीला भूक कमी लागते. ज्यामुळे एका वर्षाच्या आतच व्यक्तीचं ५० ते ६० किलो वजन कमी होऊ शकतं.
दरम्यान, वजन कमी करण्यासाठी केल्या जाणाऱ्या इतर सर्जरी फार घातक असतात. तर वजन कमी करण्यासाठी केल्या जाणाऱ्या सर्जरींपेक्षा बॅरिअॅट्रिक सर्जरीचे धोके कमी असल्याचे मानले जाते. ही सर्जरी लेप्रोस्कोपिक पद्धतीने केली जाते, ज्यात व्यक्तीला वेदना कमी होतात. तरी सुद्धा वर्षभर रूग्णाची विशेष काळजी घ्यावी लागते.