जम्मू - पंजाबमधीलपूरग्रस्त गावातून केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) २२ जवान आणि तीन नागरिकांना लष्कराच्या हेलिकॉप्टरने धाडसी कारवाई करीत बुधवारी सकाळी वाचवले. या सर्वांनी एका इमारतीत आश्रय घेतला होता; परंतु त्यांना बाहेर काढल्यानंतर लगेचच इमारत कोसळली.
पंजाबच्या अनेक भागांत सततच्या मुसळधार पावसामुळे पूर आला आहे. संरक्षण प्रवक्त्याने सांगितले की, आर्मी एव्हिएशनने जलद व धाडसी कारवाई करीत मंगळवारपासून जम्मू आणि काश्मीरमधील लखनपूरच्या सीमेवरील माधोपूर हेडवर्क्सजवळ अडकलेल्या २५ जांना वाचवले.
ते म्हणाले की, आव्हानात्मक परिस्थिती असूनही, बुधवारी सकाळी ६ वाजता आर्मी एव्हिएशन हेलिकॉप्टर बचाव कार्यासाठी रवाना झाले आणि अडकलेल्या सर्व लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. ज्या इमारतीत हे लोक आश्रय घेत होते, ती इमारत त्यांना बाहेर काढल्यानंतर लगेचच कोसळली. यावरून बचावकार्य वेळेवर पूर्ण झाले आणि याची अचूकता दिसून येते.