भारत-पाकिस्तानमधील तणावामुळे भारतीय सैन्याने सर्व अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द केल्या आहेत. मेजर विक्रम गुप्ता हे कामावर परतत असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला. दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वेवर दिल्लीचे रहिवासी मेजर विक्रम गुप्ता यांच्या गाडीचा टायर फुटला आणि भीषण अपघात झाला. या अपघातात त्यांची पत्नी वैशाली यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांची ३ वर्षांची मुलगी रिहाना गंभीर जखमी झाली आहे.
रिहानावर अलवर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हेड कॉन्स्टेबल फकरुद्दीन यांनी दिलेल्या माहितीनुसार, मेजर सुट्टीनंतर ड्युटीवर परतत असताना दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वेवर त्यांच्या कारचा टायर फुटल्याने मोठा अपघात झाला. त्यांच्या डोळ्यादेखतच पत्नीचा मृत्यू झाला, तर त्यांची मुलगी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर अलवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कारचा टायर अचानक फुटला
मेजर विक्रम गुप्ता दिल्लीतील दिलशाद गार्डनजवळ राहतात. ते त्यांच्या पत्नी आणि मुलीसह नातेवाईकांना भेटण्यासाठी कोटा येथे गेले होते. याच दरम्यान त्यांना मुख्यालयातून सुट्टी रद्द झाल्याची माहिती मिळाली, त्यानंतर ते त्यांच्या कुटुंबासह दिल्लीला परतत होते. दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वेवरील नौगांवा पोलीस स्टेशन परिसरातील कल्व्हर्ट क्रमांक ८२ जवळ कारचा टायर अचानक फुटला, ज्यामुळे कार नियंत्रणाबाहेर गेली आणि अपघात झाला.
रिहानाची प्रकृती गंभीर
अपघातात कारचा दरवाजा उघडताच वैशाली आणि रिहाना रस्त्यावर पडल्या. रस्त्याने जाणाऱ्यांच्या मदतीने दोघींनाही तातडीने अलवर रुग्णालयात नेण्यात आलं, जिथे डॉक्टरांनी वैशाली यांना मृत घोषित केलं. तर रिहानाची प्रकृती अजूनही गंभीर आहे. पोलिसांनी मृतदेहाचं शवविच्छेदन करून तो कुटुंबीयांकडे सोपवला आहे. या घटनेने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.