अमेरिकेतील आघाडीची टेक कंपनी ॲपलच्या आयफोनची जगभरात क्रेझ आहे. जगातील अनेक देशांमध्ये या कंपनीचे फोन सर्वाधिक वापरले जातात. भारतातही आयफोन वापरणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशच्या अलिगड येथून आयफोनबाबत महत्त्वाची माहिती समोर आली. एका तरुणाच्या खिशातच आयफोनचा स्फोट झाल्याने त्याला गंभीर दुखापत झाल्याचे वृत्त आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून आयफोन वापरकर्त्यांमध्ये भिती निर्माण झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही धक्कादायक घटना अलीगड जिल्ह्यातील छारा पोलीस स्टेशन परिसरात येणाऱ्या शिवपुरी येथे घडली. एका तरुणाचा आयफोन त्याच्या खिशात असताना अचानक त्याचा स्फोट झाला. या स्फोटामुळे त्याला गंभीर दुखापत झाली. स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु, स्फोटानंतर तरुण वेदनेने ओरडला आणि त्याने खिशातून जळणारा आयफोन बाहेर काढला. त्यानंतर त्याला ताबडतोब जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
संबंधित तरुणाने काही दिवसांपूर्वीच आयफोन १३ खरेदी केला होता. आयफोन हा प्रीमियम स्मार्टफोन आहे. परंतु, तरीही यात स्फोट झाल्याने याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अलिगड पोलिसांनी या प्रकरणासंदर्भात तपास सुरू केला आहे आणि आयफोनच्या स्फोटामागील कारण शोधण्यासाठी तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे. स्मार्टफोनचा स्फोट होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही बॅटरी किंवा चार्जिंग सिस्टममधील समस्यांमुळे फोनमध्ये स्फोट झाल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत.