Kulgam Encounter:जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील अखल देवसर भागात सलग तिसऱ्या दिवशीही दहशतवाद्यांविरोधात चकमक सुरू आहे. आज तिसऱ्या दिवशी आणखी एक दहशतवादी मारला गेला आहे. याआधी शनिवारी दोन दहशतवादी ठार झाले होते. अखलच्या जंगलात रात्रभर स्फोट आणि गोळीबार सुरूच होता. ही या वर्षातील सर्वात मोठी कारवाई असू शकते, असं भारतीय लष्कराकडून सांगण्यात आलंय. या कारवाईत एक जवान जखमी झाला आहे.
जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेली चकमक आजही सुरू आहे. या चकमकीत सुरक्षा दलांना आतापर्यंत तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात यश आले आहे. शनिवारी कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दलांनी लष्कर-ए-तोयबाचा हरिस नजीरसह दोन दहशतवाद्यांना ठार मारले. तिघेही कुलगाम जिल्ह्यातील अखलच्या जंगलात लपले होते. यामध्ये एक लष्करी अधिकारीही जखमी झाला असून त्यांना श्रीनगरमधील लष्कराच्या ९२ बेस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
या भागात आणखी दहशतवादी लपल्याचा संशय असल्याने लष्करी कारवाई सुरू आहे. शनिवारी रात्रीही गोळीबार सुरूच होता. या दहशतवादविरोधी कारवाईत तंत्रज्ञानाची देखरेख करणारी यंत्रणा आणि विशेष पॅरा फोर्सचे जवान आहेत. जम्मू आणि काश्मीरचे डीजीपी आणि लष्कराच्या १५ व्या कॉर्प्सचे कमांडर या दहशतवादविरोधी कारवाईवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अखलच्या जंगलात सुरू असलेल्या या दहशतवादविरोधी कारवाईत विशेष ऑपरेशन्स ग्रुप (एसओजी), लष्कर आणि केंद्रीय राखीव पोलिस दल (सीआरपीएफ) यांची संयुक्त टीम कारवाई करत आहे.
दहशतवादी अखलच्या जंगलात असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी १ ऑगस्ट रोजी दक्षिण काश्मीरमधील अखलच्या जंगलात शोध मोहीम सुरू केली. लपलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केल्यानंतर चकमक सुरु झाली. सुरक्षा दलांनी जोरदार प्रत्युत्तर देत शनिवारी दोन आणि रविवारी एक अशा तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं.