पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या ८ तळांसह १३ लक्ष्यांवर भारत इतक्या अचूकपणे मारा कसा करू शकला? पाकिस्तानचा पूर्णपणे धुव्वा कसा उडाला? असे प्रश्न जगभरातील तज्ज्ञांना पडले असून, ते आश्चर्यचकित झाले आहेत. ९ आणि १० मे दरम्यानच्या रात्री, जेव्हा पाकिस्तानने क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने भारतीय लष्करी आणि नागरी क्षेत्रांवर सर्वांत मोठे हल्ले केले, तेव्हा अभेद्य, भारतीय स्वसंरक्षण भिंतीने ते पूर्णपणे विफल केले. या भिंतीचे नाव - आकाशतीर.
या आकाशतीर प्रणालीनेच पाकिस्तानी हवाई ड्रोन, क्षेपणास्त्रे, इतर छोटी यूएव्ही म्हणजे मानवविरहित हवाई वाहने आणि हवेतल्या इतर शस्त्रास्त्रांना नेस्तनाबूत केले आणि त्यांना भारतीय हवाई क्षेत्रात प्रवेश करण्यापासून रोखले. आकाशतीर पूर्णपणे स्वदेशी उत्पादन आहे. आकाशतीरच्या तुलनेत, पाकिस्तानची सुरक्षा प्रतिसाद प्रणाली वेळेवर प्रक्षेपणास्त्र शोधण्यात आणि भेदण्यात पूर्णपणेअपयशी ठरली.
आकाशतीर सर्व संबंधितांना (नियंत्रण कक्ष, रडार आणि हवाई संरक्षण मारकांना) सामायिक रिअल टाइम चित्र पुरवते, जेणेकरून समन्वित हवाई कारवाया सक्षम होतात. शत्रूची विमाने, ड्रोन्स आणि क्षेपणास्त्रे आपणहून शोधणे, त्याचा माग राखणे यासाठी ही प्रणाली तयार करण्यात आली आहे. विविध रडार यंत्रणा, सेन्सर्स आणि वेगवेगळ्या कम्युनिकेशन टेक्नालॉजीज एकाच संचालन चौकटीत या प्रणालीद्वारे जोडण्यात आल्या आहेत.
कसे चालते या प्रणालीचे काम?आकाशतीर अनेक स्रोतांकडून डेटा गोळा करते, त्यावर प्रक्रिया करते आणि स्वयंचलित, वास्तविक वेळेतल्या स्थितीनुसार निर्णय घेणे शक्य करते. आकाशतीर हे विस्तृत C4ISR (कमांड, कंट्रोल, कम्युनिकेशन्स, कंप्युटर, इंटेलिजेंस, सर्व्हेलन्स आणि रिकौनीसन्स) चौकटीचा भाग आहे, जी इतर प्रणालींशी समन्वय साधून काम करते.
आकाशतीरची खुबी बुद्धिमत्ता आधारित युद्धतंत्रात आहे. तिचे तंत्र युद्धक्षेत्रात कमी पातळीवरील हवाई क्षेत्राचे निरीक्षण आणि जमिनीवर आधारित हवाई संरक्षण शस्त्र प्रणालींचे कार्यक्षम नियंत्रण शक्य करते. आपल्या रणनीती सिद्धांतामधला नवा अध्याय आकाशतीर आहे. जगभरातले तज्ज्ञ आता आकाशतीरला ‘युद्ध रणनीतीतला भूकंपीय बदल’ म्हणूनसंबोधत आहेत.