हैदराबाद : आंध्र प्रदेशची नवी राजधानी विजयवाडाजवळ उभारणार असल्याची घोषणा करून मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी गुरुवारी राजधानीच्या स्थळाबद्दल गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या चर्चेसह अन्य शक्यतांनाही विराम दिला.
विधानसभेत विरोधी पक्षाने केलेल्या गोंधळादरम्यान नायडू यांनी, 1 सप्टेंबर रोजी मंत्रिमंडळाने नवी राजधानी विजयवाडाजवळ बनवली जावी असा निर्णय घेतल्याचे जाहीर केले.
याचसोबत, राज्यात सरकार विकासाचे विकेंद्रीकरण करणार असून, तीन मोठय़ा शहरांसह 14 स्मार्ट शहरेही विकसित करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. यासाठी जमिनीची व्यवस्था कॅबिनेटची उपसमिती करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कॅबिनेटचा हा निर्णय नागरिकांच्या इच्छेचे प्रतिरूप आहे. तसेच केंद्राने नियुक्त केलेल्या शिवराम कृष्णन समितीकडे विविध भागातून आलेल्या मतांनाही तो पाठिंबा देणारा आहे असे नायडू पुढे म्हणाले.
(वृत्तसंस्था)