ऑनलाइन लोकमत
पाटणा, दि. ८ - बिहार विधानसभा निवडणुकीतील मतमोजणीत पहिल्या तासाभरात भाजपाने मुसंडी मारल्याने उत्साही भाजपा कार्यकर्ते गुलाल लावून भाजपा कार्यालयात आले. पण तासाभरानंतर मतमोजणीत भाजपाची पिछेहाट सुरु झाली आणि कार्यकर्ते अंगावरील गुलाल झटकत हताश मनाने माघारी परतले.
बिहार विधानसभेतील २४३ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान झाले असून आज (रविवार) मतमोजणी सुरु आहे. पहिल्या काही तासांमध्येच जदयू - राजद- काँगेसच्या महाआघाडीची स्पष्ट बहुमताच्या दिशेने घौडदौड सुरु असून भाजपाप्रणीत रालोआ पराभवाच्या छायेत आहे. भाजपासाठी हा मोठा हादरा असून भाजपाच्या कार्यालयातही हेच चित्र दिसून आले. मतमोजणीच्या पहिल्या तासाभरात कल भाजपाच्या बाजूने लागत होते व यामुळे भाजपाच्या गोटात उत्साह संचारला होता. भाजपाचे अतिउत्साही कार्यकर्ते गुलाल लावून जल्लोष करत कार्यालयात दाखलही झाले. पण तासाभरानंतर चित्र बदलले व जदूय - राजदच्या महाआघाडीने भाजपाला मागे टाकले. यामुळे भाजपा कार्यालयात निराशेचे वातावरण पसरले होते. निराशमनाने कार्यकर्ते गुलाल झटकत माघारी परतू लागले.