तीन सेकंदात घरबसल्या कळणार पाण्यातील फ्लोराईडची मात्रा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2020 02:23 AM2020-08-16T02:23:34+5:302020-08-16T02:23:37+5:30

प्रौद्योगिकी मंत्रालयातील वैज्ञानिकांनी बनविलेल्या विशेष पेपर किटमुळे अवघ्या तीन सेकंदात पाण्यातील फ्लोराईडची मात्रा तपासता येणार आहे, तेही अगदी घरबसल्या.

The amount of fluoride in the water will be known in three seconds | तीन सेकंदात घरबसल्या कळणार पाण्यातील फ्लोराईडची मात्रा

तीन सेकंदात घरबसल्या कळणार पाण्यातील फ्लोराईडची मात्रा

Next

नितिन अग्रवाल 
नवी दिल्ली : महाराष्ट्रासह देशातील तब्बल १७ राज्यातील शेकडो नागरिकांना फ्लोराईडयुक्त पिण्याच्या पाण्यामुळे अस्थिव्यंगाच्या भयंकर यातनांना सामोरे जावे लागते. पाण्यातील या घातक विषारी द्रव्याची आता त्वरित शहनिशा करणे शक्य होणार आहे. केंद्र सरकारच्या विज्ञान आणि प्रौद्योगिकी मंत्रालयातील वैज्ञानिकांनी बनविलेल्या विशेष पेपर किटमुळे अवघ्या तीन सेकंदात पाण्यातील फ्लोराईडची मात्रा तपासता येणार आहे, तेही अगदी घरबसल्या.
नॅनो तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या नॅनो विज्ञान आणि प्रौद्योगिकी संस्थेच्या शास्त्रज्ञाने 'लोकमत'शी बोलताना या पेपर किटबद्दल माहिती दिली. या पेपर कुठवर पाण्याचे काही थेंब टाकताच पाण्यातील फ्लोराईड आणि पेपर किटमधील रसायनांमध्ये रासायनिक प्रक्रिया घडायला सुरूवात होते. यात किटचा रंग लाल किंवा तांबूस होऊन जातो. पाण्यात फ्लोराईडची मात्रा जितकी जास्त तेव्हढ्या अधिक प्रमाणात किटचा रंग गडद व्हायला लागतो. पाण्यातील फ्लोराईडची मात्रा शोधण्याचा हा सर्वात स्वस्त आणि किफायतशीर किट असल्याचे या शास्त्रज्ञाने सांगितले. या किटचे पेटंट घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. शिवाय, आतापर्यंत दोन खासगी कंपन्यांनी या किटचे व्यावसायिक उत्पादन करून ती बाजारात आणण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यासंदर्भात बोलणी अद्याप सुरू आहेत.
१७ राज्यांत फ्लोराईडयुक्त पाण्याची समस्या
महाराष्ट्रासह देशातील १७ राज्यांमध्ये फ्लोराईडयुक्त पाण्याची समस्या आहे. अशा प्रकारचे पाणी प्यायल्याने फ्लोरोसिस नावाचा गंभीर आजार होण्याचा धोका असतो. या आजारामुळे दात खराब होतात. शिवाय, शरीरातील हाडे वाकडी झाल्याने अस्थिव्यंगातून कायमचे अपंगत्वाचाही मोठा धोका असतो. आतापर्यंत, पाण्यातील फ्लोराईडची मात्रा मोजण्याची कोणतीच साधी आणि घरच्याघरी वापरता येईल अशी यंत्रणा उपलब्ध नव्हती. या पेपर किटमुळे ही अडचण दूर होण्यास मदत मिळणार आहे.
>महाराष्ट्रात १५६३ ठिकाणी फ्लोराइडयुक्त पाणी
नागपुरसह आसपासच्या विविध जिल्ह्यातील पाण्याच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यापैकी १ हजार ५६३ नमुने फ्लोराईडयुक्त आढळून आले. नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक ७६४ आणि चंद्रपुरात ७२३ ठिकाणी फ्लोराईडयुक्त पाणी आढळून आले. याशिवाय, वर्धा, भंडारा, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यातही अनेक विहिरी आणि बोअरवेलच्या पाण्यात हा विषारी घटक आढळून आला आहे.
>दरवर्षी हजारो कोटी पडतात खर्ची
फ्लोराईडयुक्त पाण्यावर होणाºया खर्चाचा आकडा पाहिला तर या समस्येची तीव्रता तात्काळ ध्यानात येते. अलीकडेच केंद्र सरकारने लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार २७ हजार ५४४ गावांतील पाण्यात फ्लोराईड आढळून आले आहे. फ्लोराईडने प्रभावित राज्यांना २०१६-१७ या वर्षात सुमारे चार हजार कोटींचा निधी वितरीत करण्यात आला होता.

Web Title: The amount of fluoride in the water will be known in three seconds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.