एकीकडे लोकसभेत पावसाळी अधिवेशन सुरु आहे, दुसरीकडे बिहारमध्ये मतदान यादीवरून रणकंदन, अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची वेगवेगळी भेट घेतली आहे. रविवारी दिल्लीत या मोठ्या घडामोडी घडल्याने उद्या ५ ऑगस्टला काही मोठे घडणार आहे का, असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे.
मोदी सरकारने दोन ऐतिहासिक निर्णय हे ५ ऑगस्टलाच घेतलेले आहेत. यंदाही त्याच्या आधीच या हायलेव्हल बैठका झाल्याने चर्चांना उधाण आले आहे. रविवारी मोदी राष्ट्रपतींना भेटून येताच चार तासांनी शाह देखील राष्ट्रपती भवनावर दाखल झाले होते. या दोन्ही नेत्यांसोबत काय चर्चा झाली याची माहिती ना राष्ट्रपती भवनाकडून देण्यात आली ना केंद्र सरकारकडून. यामुळे या भेटींमागचे रहस्य आणखीनच गडद होत गेले आहे.
बिहार निवडणूक आयोग सिर, माजी उपराष्ट्रपतींचा राजीनामा आणि लागलेली निवडणूक यावर चर्चा झालीच असेल असेही म्हटले जात आहे. या भेटीकडे ५ ऑगस्टचे कनेक्शन जोडले जात आहे. ५ ऑगस्ट रोजी सरकार काही महत्त्वाचे विधेयक आणत असल्याची चर्चा आहे, कारण ५ ऑगस्ट २०१९ रोजी मोदी सरकारने जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० रद्द करण्याचा आणि राज्याचे दोन भागात विभाजन करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ५ ऑगस्ट २०२० रोजी पंतप्रधान मोदींनी अयोध्येत राम मंदिराची पायाभरणी केली होती. अशा परिस्थितीत, पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांनी राष्ट्रपतींना भेटल्यामुळे, ५ ऑगस्टची चर्चा होऊ लागली आहे.
संसदेत अनेक संवेदनशील विधेयके जसे की समान नागरी संहिता (UCC) आणण्यात येणार असल्याचा अंदाज आहे. आसाम आणि गुजरातच्या भाजप सरकारने राज्य पातळीवर युसीसी आणण्याची घोषणा केली आहे. युसीसी हा भाजपच्या मुख्य अजेंड्याचा एक भाग आहे, ज्यामध्ये राम मंदिर बांधण्याचे आणि जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याचे स्वप्न साकार झाले आहे. फक्त युसीसी उरला आहे, जो अंमलात आणायचा आहे.