आखाड्यांच्या ध्वजारोहणाला अमित शाह, मुख्यमंत्री येणार
By admin | Updated: August 8, 2015 00:23 IST
महंत ग्यानदास : महापालिकेकडून कार्यक्रमाची तयारी
आखाड्यांच्या ध्वजारोहणाला अमित शाह, मुख्यमंत्री येणार
महंत ग्यानदास : महापालिकेकडून कार्यक्रमाची तयारी पंचवटी : साधुग्राममधील तिन्ही आखाड्यांचे ध्वजारोहण दि. १९ रोजी होणार असून, या सोहळ्याला भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश महाजन आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती अखिल भारतीय आखाडा परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष महंत ग्यानदास यांनी दिली. अखिल भारतीय श्रीपंच दिगंबर अनी आखाडा, अखिल भारतीय श्री पंच निर्मोही अनी आखाडा तसेच अखिल भारतीय श्रीपंच निर्वाणी अनी आखाडा या तिन्ही आखाड्याचे ध्वज्वारोहण दि. १९ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता तपोवनातील साधुग्रामनगरीत होणार आहे. या ध्वजारोहण सोहळ्यासाठी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस, पालकमंत्री गिरीश महाजन आदि मान्यवरांना निमंत्रण देण्यात आले असून, त्यांनी या सोहळ्यासाठी येण्याचे मान्य केले आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध पक्षांच्या राष्ट्रीय नेत्यांना निमंत्रण पाठविले आहे, असेही ग्यानदास महाराज म्हणाले. पर्वणी काळात अति महत्त्वाच्या व्यक्ती आल्यास प्रशासन आणि पोलीस यंत्रणेवर ताण पडू शकतो. त्यामुळे त्यांनी या काळात प्रवेश करू नये, अशी विनंतीही ग्यानदास महाराज यांनी केली. ध्वजारोहण सोहळ्यासाठी साधुग्रामनगरीत जगद्गुरू रामानुजाचार्य प्रवेशद्वारानजीक व्यासपीठ उभारण्यात येणार असून, प्रशासनाकडून यासाठी तयारी करण्यात येत आहे. जनतेने या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन त्यांनी केले. (वार्ताहर)