केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या नावावर खास विक्रम नोंदवण्यात आला आहे. सर्वाधिक काळ देशाचे गृहमंत्रीपद भुषवण्याचा मान अमित शाह यांना मिळाला आहे. या बाबतीत अमित शाह यांनी माजी गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी यांना मागे टाकले आहे. याच पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमित शाहांचे कौतुक केले आहे.
अमित शाह हे २ हजार २५८ दिवस भारताचे गृहमंत्री राहिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात त्यांनी ३० मे २०१९ रोजी पहिल्यांदाच गृहमंत्री पद स्वीकारले. त्यानंतर २०२४ मध्ये एनडीए सरकार स्थापन झाल्यानंतरही गृहमंत्रीपदाची जबाबदारी पुन्हा त्यांच्याच खांद्यावरच सोपवण्यात आली. माजी गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत २ हजार २५६ दिवस गृहमंत्रीपद भुषवले. तर, सरदार वल्लभभाई पटेल हे १ हजार २१८ दिवस देशाचे गृहमंत्री राहिले.
अमित शाह यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक मोठे निर्णय घेतले. शाह यांच्या कार्यकाळात जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवण्यात आले, ज्याला आज सहा वर्षे पूर्ण झाली आहेत. शिवाय, नागरिकत्व सुधारणा कायदा मंजूर करण्यात आला. त्याच वेळी, समान नागरी संहिता देखील लागू करण्यात आली. शिवाय, त्यांनी तिहेरी तलाकबाबत मोठा निर्णय घेतला आणि तो बेकायदेशीर घोषित केला. यासोबतच त्यांनी दहशतवादाविरुद्ध कठोर कारवाई केली.
मोदींकडून शाहांचे कौतूक
एनडीए खासदारांसोबत झालेल्या बैठकीदरम्यान मोदींनी गृहमंत्री अमित शहा यांचेही कौतुक केले. ते म्हणाले की, अमित शाहा आता सर्वाधिक काळ देशाचे गृहमंत्रीपद भुषवणारे गृहमंत्री बनले आहेत. ५ ऑगस्ट हा एक ऐतिहासिक दिवस आहे, याच दिवशी जम्मू आणि काश्मीर राज्याला विशेष अधिकार देणारे कलम ३७० रद्द करण्यात आले. एनडीए सरकारने खऱ्या अर्थाने संविधानाचे पालन केले आहे, असेही ते म्हणाले.