काही दिवसांपूर्वी अमेरिकेने १०४ अवैध भारतीयांना हातात हातकड्या आणि पायात साखळदंड घालून भारतात पाठवून दिले होते. यावरून भारतात खळबळ उडाली होती, केंद्र सरकारवर टीकाही झाली होती. मोदींनी अमेरिका दौऱ्यावेळी हे लोक फसविले गेलेले आहेत, असे ट्रम्पना म्हटले होते. यानंतरही आज ११६ जणांना पुन्हा तसेच हात,पाय बांधून भारतात पाठविण्यात आले आहे.
अमेरिकी सैन्याचे सी १७ विमान शनिवारी रात्री साडे अकरा वाजता अमृतसर विमानतळावर उतरले. या विमानात पंजाबचे ६५,हरियाणाचे ३३, गुजरातचे ८, युपी-महाराष्ट्र व राजस्थानचे दोन-दोन, हिमाचल, गोवा, जम्मू काश्मीरचा प्रत्येकी एक व्यक्ती आहे.
शनिवारी रात्री आलेल्या या ११६ प्रवाशांना गेल्यावेळसारखीच वागणूक देण्यात आली आहे. विमानातून उतरण्यापूर्वी या बेड्या काढण्यात आल्या. महिला आणि मुलांना मोकळे ठेवण्यात आले होते. यामध्ये शीख लोकही होते, परंतू, शीख तरुणांच्या डोक्यावर पगड्या नव्हत्या. यापैकी काहीजण मोठमोठ्याने ओरडून रडत होते.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी मोदींची चर्चा झाल्याने यावेळी भारतीयांना अशी वागणूक मिळणार नाही, अशी अपेक्षा केली जात होती. परंतू, अमेरिकेने पुन्हा एकदा भारतीयांना एलियन सारखी वागणूक दिली आहे. तसेच कोणत्याही देशाचा नागरिक अमेरिकेत घुसला तर त्याला हीच वागणूक मिळणार असल्याचे देखील भारतासह सर्व देशांना स्पष्ट केले आहे.
अमृतसरला आलेले हे दुसरे विमान होते, आज १६ फेब्रुवारीला तिसरे विमान या अवैध भारतीय प्रवाशांनी भरून पाठविण्यात येणार आहे. यामध्ये १५७ प्रवासी असण्याची शक्यता आहे. शनिवारी रात्री या प्रवाशांसाठी बिझनेस लाऊंजमध्ये जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच यावेळी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान देखील उपस्थित होते. ते सायंकाळी चार वाजल्यापासूनच विमानतळावर ठाण मांडून बसलेले होते.