हृदय शस्त्रक्रियेसारखी गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करून सात रुग्णांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी बोगस हृदयरोग तज्ज्ञ असलेल्या डॉक्टरला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मध्य प्रदेश येथील दमोह येथील बोगस डॉक्टर नरेंद्र जॉन कॅम याला उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथून अटक करण्यात आली आहे. या डॉक्टरविरोधात दमोह जिल्ह्यातील मुख्य उपचार आणि आयोग्य अधिकारी एम.के. जैन यांनी दिलेल्या तक्रारीवरून बनावट वैद्यकीय पदवीप्रकरणी आरोपी डॉक्टरविरोधात फसवणूक आणि लबाडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दमोहचे पोलीस अधीक्षक श्रुत कीर्ती सोमवंशी यांनी सांगितले की, आरोपी डॉक्टर नरेंद्र जॉन कॅम याला प्रयागराज येथे धाड टाकून अटक करण्यात आली आहे. आता त्याला मध्य प्रदेशमध्ये आणण्यात येत आहे. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात येईल.
दामोह जिल्ह्यातील एका मिशनरी रुग्णालयामध्ये ७ रुग्णांच्या झालेल्या मृत्यूप्रकरणी बोगस डॉक्टर नरेंद्र ज़ॉन कॅम याच्याविरोधात आरोप आहे. दरम्यान, या बोगस डॉक्टरने २००६ मध्ये छत्तीसगडमधील एका खासगी रुग्णालयामध्ये विधानसभेचे माझी अध्यक्ष आणि काँग्रेसचे नेते राजेंद्र प्रसाद शुक्ल यांच्यावरही शस्त्रक्रिया केली होती, अशी माहिती समोर आली आहे. त्यानंतर २० दिववसांनी शुक्ल यांचा मृत्यू झाला होता.