Malegaon Blast Case Verdict: मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. आज एनआयएच्या विशेष न्यायालयाने या प्रकरणी मोठा निकाल दिला. न्यायालयाने प्रज्ञासिंह यांच्यासह सर्व ७ आरोपींना या प्रकरणातून निर्दोष मुक्त केले आहे.
"मालेगावमध्ये स्फोट झाल्याचे सरकारी वकिलांनी सिद्ध केले, परंतु त्या मोटारसायकलमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला होता हे सिद्ध करू शकले नाहीत. जखमींचे वय १०१ नाही तर ९५ वर्षे होते आणि काही वैद्यकीय प्रमाणपत्रांमध्ये छेडछाड करण्यात आली होती, असा निष्कर्ष न्यायालय काढला आहे',असं निकाल वाचताना एनआयए कोर्टाचे न्यायाधीश म्हणाले.
स्फोटात ६ जणांचा मृत्यू झाला होता
२९ सप्टेंबर २००८ रोजी लोक रमजान महिना आणि नवरात्रोत्सव साजरा करण्यात व्यस्त होते. रात्री ९.३५ वाजता मालेगावमधील भिखू चौकात बॉम्बस्फोट झाला. सर्वत्र धूर आणि लोकांचे किंकाळ्या ऐकू येत होत्या. ६ जणांचा जागीच मृत्यू झाला. १०० हून अधिक लोक जखमी झाले. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव या शहरात मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात राहतात. या ठिकाणीच हा स्फोट झाला होता.
१९ एप्रिल रोजी निकाल राखून ठेवला होता
१७ वर्षांच्या खटल्यानंतर न्यायालयाने १९ एप्रिल रोजी सर्व सात आरोपींविरुद्ध निकाल राखून ठेवला होता. निकाल जाहीर करण्याची तारीख ८ मे निश्चित करण्यात आली होती.
सर्व आरोपींना या दिवशी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते, परंतु त्यानंतर न्यायालयाने निकाल जाहीर करण्यासाठी ३१ जुलै ही तारीख निश्चित केली.
न्यायालयाने निकालामध्ये काय म्हटले?
"श्रीकांत प्रसाद पुरोहित यांच्या निवासस्थानी स्फोटके साठवल्याचा किंवा जमा केल्याचा कोणताही पुरावा सापडला नाही. पंचनामा तयार करताना, तपास अधिकाऱ्यांनी गुन्ह्याच्या ठिकाणाचे कोणतेही रेखाचित्र तयार केले नाही. गुन्ह्याच्या ठिकाणावरून कोणतेही बोटांचे ठसे, डंप डेटा किंवा इतर कोणतीही माहिती गोळा करण्यात आली नाही, असं न्यायालयाने म्हटले आहे.
"नमुने देखील खराब झाले होते, त्यामुळे अहवाल निर्णायक आणि विश्वासार्ह असू शकत नाही. स्फोटात सहभागी असलेल्या बाईकचा चेसिस नंबर स्पष्ट नव्हता. स्फोटापूर्वी ती प्रज्ञासिंह यांच्या ताब्यात होती हे सरकारी वकिलांना सिद्ध करता आले नाही.
विशेष एनआयए न्यायालय, मुंबई