फाजिल्का/जयपूर/जम्मू : भारताने पहलगाम हल्ल्यावर केलेल्या प्रत्युत्तर कारवाईनंतर, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरची परिस्थिती लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून जम्मू, पंजाब आणि राजस्थानमधील भारत-पाक सीमावर्ती भागातील १४ जिल्ह्यांतील सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांनी सर्व सरकारी, अनुदानित आणि खासगी सर्व शैक्षणिक संस्थांना याबाबत सूचना दिल्या आहेत. सर्व शाळा प्रमुखांना आदेशाचे पालन सुनिश्चित करण्यासाठी कळवले आहे. पंजाबमधील फिरोजपूर, पठाणकोट, फाजिल्का, गुरुदासपूर आणि अमृतसर यासारख्या पंजाबच्या सीमावर्ती जिल्ह्यांमधील सर्व शाळा पुढील सूचना मिळेपर्यंत बंद राहतील.
केबल-कार बंद, सुरक्षा दल कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्दआशियातील सर्वात उंच आणि सर्वात लांब केबल कार राईड्सपैकी एक असलेले लोकप्रिय गुलमर्ग गोंडोला देखील अनपेक्षित परिस्थितीमुळे बंद करण्याची घोषणा करण्यात आली आहे. जम्मू आणि काश्मीर केबल कार कॉर्पोरेशनने बुधवारी सकाळी एक नोटीस जारी करून पर्यटक आणि स्थानिकांना सेवा तात्पुरती स्थगित केल्याची माहिती दिली. अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले आहे की ७ मे साठी सर्व ऑनलाइन बुकिंग पूर्णपणे परत केले जातील.सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांच्या सुट्टया रद्द केंद्रीय सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांच्या सुट्टया रद्द करण्यात आल्या आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी निमलष्करी दलांच्या प्रमुखांना रजेवर गेलेल्या कर्मचाऱ्यांना परत बोलावण्याचे आदेश दिले.
शाळा, महाविद्यालये बुधवारी बंद‘ऑपरेशन सिंदूर’नंतर राजस्थानमधील बिकानेर, जैसलमेर आणि बारमेर जिल्ह्यांतीलही सर्व शाळांमध्ये सुटी जाहीर करण्यात आली. आजपासून राज्य सामान्य परीक्षादेखील घेतल्या जाणार नाहीत. जम्मूतील जम्मू, सांबा, कठुआ, राजौरी आणि पूंछमधील सर्व शाळा, महाविद्यालये बुधवारी बंद राहतील, असे जाहीर करण्यात आले. सुरक्षेच्या कारणास्तव ही खबरदारी घेण्यात आली आहे.