लखनौ : पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांच्यापाठोपाठ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही आपल्या कार्यकाळात व्हीआयपी संस्कृतीला फाटा देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारमधील एकाही मंत्र्याला वाहनावर लाल दिवा लावण्याची मुभा दिली जाणार नाही, असे आदेश त्यांनी सोमवारी दिले. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी दोनच दिवसांपूर्वी राज्यात यापुढे व्हीआयपी संस्कृती खपवून घेतली जाणार नाही, असे सांगून मंत्र्यांच्या वाहनांवर लाल दिवे असणार नाहीत, असे जाहीर केले होते. त्यानंतर योगी आदित्यनाथ यांचा हा निर्णय आला आहे. अमरिंदरसिंग यांनी पंजाबच्या सर्व मंत्र्यांच्या परदेश दौऱ्यावर दोन वर्षे बंदी घातली आहे आणि सरकारी खर्चाने मेजवान्या आयोजित करण्यासही मज्जाव केला आहे. (वृत्तसंस्था)
पंजाब, यूपीतील सर्व मंत्र्यांचे गेले लाल दिवे!
By admin | Updated: March 21, 2017 04:09 IST