ऑनलाइन लोकमत
लखनौ, दि. ८ - उत्तर प्रदेशामधल्या वाढत्या गुन्हेगारीसाठी परप्रांतीय जबाबदार असल्याचा आरोप युपीचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी केला असून याबाबतीत त्यांचे चक्क राज ठाकरे यांच्याशी एकमत झाल्याचे दिसून येत आहे. युपीमध्ये घडत असलेल्या गुन्ह्यांमध्ये असे आढळून आले आहे की, हरयाणा, पंजाब व उत्तराखंड या राज्यातले गुन्हेगार युपीत येतात गुन्हे करतात व पसार होतात, असे यादव यांनी एका इंग्रजी नियतकालिकाला सांगितले. नुकत्याच झालेल्या एटीएमवरील दरोडा प्रकरणातील दरोडेखोर हरयाणा, पंजाब व उत्तराखंडमधले होते असा दाखलाही त्यांनी दिला आहे.
उत्तर भारतातले लोक महाराष्ट्रातल्या गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतले असून महाराष्ट्र पोलीसांचा अर्धा वेळ त्यांना त्या त्या राज्यातून पकडूनन आणण्यात जातो असा आरोप ठाकरे यांनी केला होता. ठाकरे यांच्या परप्रांतीयविरोधातील भूमिकेमुळे त्यांच्यावर टीका झाली होती. आता अखिलेश यादव यांच्या वक्तव्याकडे कसे बघितले जाते हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.