मुंबईहून जोधपूरला जाणाऱ्या एअर इंडियाच्या 'एआय ६४५' विमानाला शुक्रवारी २२ ऑगस्ट रोजी मुंबईविमानतळावर परत आणण्यात आलं. उड्डाण घेतल्यानंतर विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने हा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती एअर इंडियाच्या प्रवक्त्याने दिली.
प्रवक्त्याने सांगितलं की, विमानाच्या उड्डाणानंतर तांत्रिक समस्या लक्षात आल्या. त्यानंतर वैमानिकांनी नियमांनुसार, उड्डाण थांबवण्याचा निर्णय घेतला आणि विमान मुंबई विमानतळावर सुरक्षितपणे उतरवण्यात आलं. विमानात असलेल्या प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचवण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे.
अहमदाबादमधील दुर्दैवी घटनायापूर्वी जून महिन्यात अहमदाबादच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर एअर इंडियाच्या एका विमानाचा मोठा अपघात झाला होता. या अपघातात वैमानिकांसह २४० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता, ज्यामुळे केवळ भारतातच नाही, तर जगभरात खळबळ माजली होती.
या भीषण अपघातानंतर विमानात तांत्रिक बिघाडामुळे उड्डाणं रद्द होण्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. मुंबईहून जोधपूरला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने ते मुंबईला परत आल्याची बातमी देखील याच पार्श्वभूमीवर समोर आली आहे.
मुंबईतील वैमानिकाचं कौतुकअलीकडेच, मुंबई विमानतळावरील आणखी एक व्हिडीओ समोर आला, ज्यात वैमानिकाचं खूप कौतुक केलं जात आहे. मुंबईत सध्या मान्सूनचा जोर वाढला आहे. जोरदार पाऊस, वादळी वारे आणि पाणी साचल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे.
अशा बिघडलेल्या हवामानात एअर इंडियाच्या एका वैमानिकाने आपल्या बुद्धीमत्तेने विमान उतरवताना एक मोठा अपघात टाळला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये, 'मुंबईत मुसळधार पाऊस असतानाही कॅप्टन नीरज सेठी यांनी त्यांच्या प्रसंगावधानामुळे विमान अगदी सहज उतरवलं, त्यांना सलाम!' असं लिहिण्यात आलं होतं. त्यांच्या या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत आहे.