Ahmedabad Air India Plane Crash: अहमदाबादमधील भीषण विमान अपघातानंतर एअर इंडियाबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. नागरी वाहतूक मंत्रालयाने प्राथमिक अहवालात फ्युएल कंट्रोल स्विच लॉकिंग सिस्टमचा उल्लेख केल्याने नवी शंका निर्माण झाली होती. नागरी विमान वाहतूक संचालनालयाने एअर इंडियाला त्यांच्या विमानांची कसून तपासणी करण्यास सांगितलं होतं. त्यानंतर आता एअर इंडियाने त्यांच्या ताफ्यातील सर्व बोईंग ७८७ आणि बोईंग ७३७ विमानांच्या फ्युएल कंट्रोल स्विचच्या लॉकिंग यंत्रणेची खबरदारीची तपासणी पूर्ण केली आहे. यासह, एअरलाइनने १४ जुलै २०२५ रोजी जारी केलेल्या डीजीसीएच्या सूचनांचे पालन केल्याचे सांगण्यात आलं आहे.
नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने एअर इंडिया विमान अपघाताच्या चौकशीचा प्राथमिक अहवाल काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध केला होता. एअर इंडियाच्या बोईंग ७८७ विमानाच्या दोन्ही इंजिनांना इंधन पुरवठा उड्डाणानंतर अवघ्या तीन सेकंदात थांबला. विमानाचे फ्युएल कंट्रोल स्विच काही सेकंदांच्या कालावधीत रनवरून कटऑफवर गेले होते. त्यामुळे फ्युएल कटऑफ स्विच बंद असल्याने इंधन इंजिनपर्यंत पोहोचू शकले नाही आणि वैमानिकांना टेकऑफ करता आलं नाही आणि अपघात झाल्याचे अहवालात म्हटलं होतं.
त्यानंतर डीसीएच्या आदेशानुसार आता एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७-बोईंग ७३७ विमानांमधील फ्युएल कंट्रोल स्विचची तपासणी पूर्ण झाली आहे, ज्यामध्ये कोणताही दोष आढळला नाही. १४ जुलै २०२५ रोजी डीजीसीएच्या सूचनांनुसार ही तपासणी वेळेवर पूर्ण झाली आणि या तपासणीत कोणताही दोष आढळला नसल्याचे एअर इंडियाकडून सांगण्यात आलं. इंडियन एअरलाइन्सने १२ जुलै रोजी स्वतःहून बोईंग फ्लीटच्या फ्युएल सिस्टमची तपासणी सुरू केली होती.प्रवाशांच्या आणि क्रूच्या सुरक्षेसाठी ते पूर्णपणे वचनबद्ध असल्याचे एअर इंडियाने म्हटले.
दरम्यान, १२ जून रोजी अहमदाबादमध्ये झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर ही तपासणी करण्यात आली. १२ जून रोजी, एअर इंडियाचे बोईंग ७८७-८ विमानान अहमदाबादहून गॅटविक लंडनसाठी उड्डाण केल्यानंतर काही वेळातच एका इमारतीवर कोसळले. या अपघातात २६० लोकांचा मृत्यू झाला, ज्यात विमानात २४२ प्रवासी आणि क्रू मेंबर्सचा समावेश होता.