Bengaluru Crime : कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये भारतीय हवाई दलाच्या अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. अधिकारी आणि त्याची पत्नी विमानतळाकडे जात असताना काही लोकांनी त्यांचा पाठलाग करत गाडी थांबवली आणि हल्ला केला. या हल्ल्यात विंग कमांडर आदित्य बोस यांचा चेहरा आणि डोक्यावर गंभीर दुखापत झाली. अधिकाऱ्याने स्वतःचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत या हल्ल्याची माहिती दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, विंग कमांडर आदित्य बोस आणि त्याची पत्नी स्क्वॉड्रन लीडर मधुमिता 18 एप्रिल रोजी सीव्ही रमन नगर येथील डीआरडीओ कॉलनीतून विमानतळाकडे जात असताना ही घटना घडली. आदित्य यांनी सांगितल्यानुसार, एका दुचाकीस्वाराने त्यांची गाडी थांबवली आणि कन्नडमध्ये शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. गाडीवर डीआरडीओचा स्टिकर पाहून दुचाकीस्वाराने आणखी घाण शब्दात शिव्या दिल्या. यावेळी त्याने मधुमिता यांनाही शिवीगाळ केली.
यानंतर आदित्य बोस आपल्या गाडीतून बाहेर उतरताच हल्लेखोराने आदित्य यांच्या चेहऱ्यावर दोरदार ठोसा मारला. यावेळी हल्लेखोराच्या हातात असलेली गाडीची चाबी आदित्य यांच्या कपाळात घुसली. यावेळी त्यांनी स्थानिकांना मदतीची याचना केली, पण कुणीही मदतीसाठी पुढे आला नाही. यानंतर आणखी काही लोक आले, त्यांनीही आदित्य आणि मधुमिता यांना शिवीगाळ केली. यावेळी एकाने कारवर दगड मारण्याचा प्रयत्न केला, तो आदित्य यांच्या डोक्याला लागला.
आदित्य यांच्या दाव्यानुसार, या घटनेनंतर त्यांनी पोलिसात तक्रार दाखल करण्यासाठी गेले, पण तिथेही त्यांना फारसा प्रतिसाद मिळाला नाही. दरम्यान, हा हल्ला विनाकारण झाला की इतर काही कारणाने झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी सांगितले की, ते संबंधित अधिकाऱ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. भारतीय हवाई दलानेही अद्याप या घटनेवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.