Agniveer Lovepreet Singh :जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत पंजाबमधील मानसा येथील एक अग्निवीर जवान शहीद झाला. कुपवाडा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात मानसा गावातील अकालिया येथील २४ वर्षीय अग्निवीर जवान लवप्रीत सिंग शहीद झाला आहे. आज दुपारपर्यंत त्यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी पोहोचले. तो दोन भावांमध्ये सर्वात लहान होता आणि त्याचे अजून लग्नही झालेले नव्हते. लवप्रीतच्या निधनाने संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून त्याच्या कुटुंबियांना जबर धक्का बसला आहे. दोन दिवसांपूर्वी आईशी फोनवर बोलणं झालं होतं. दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत आपला मुलगा शहीद झाल्याची बातमी ऐकून कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
लवप्रीत दोन वर्षांपूर्वी अग्निवीर योजनेंतर्गत भारतीय सैन्यात दाखल झाला होती. लवप्रीत मीडियम रेजिमेंट युनिटमध्ये तैनात होता. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी लवप्रीतने त्याच्या पालकांशी बोलून त्यांना आपल्या कामाबद्दल सांगितले होते. लवप्रीतची कौटुंबिक पार्श्वभूमीही लष्कराशी संबंधित आहे. तरुण मुलाच्या निधनाने सिंग कुटुंबात मात्र शोककळा पसरली आहे.
लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी त्याला आधीच सुटी देण्यात आली होती, असे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. तो काही दिवसांनी घरी येणार होता. कुपवाडा येथे बुधवारी दुपारी ३ वाजता दहशतवाद्यांशी चकमक झाली. यावेळी लवप्रीत सिंग जखमी झाला. त्यानंतर लष्कराच्या जवानांनी त्याला रुग्णालयात नेले, मात्र तो शहीद झाला. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी लवप्रीत सिंगला श्रद्धांजली वाहताना मी त्यांच्या कुटुंबाप्रती मनापासून संवेदना व्यक्त करतो, असं म्हटलं आहे. "जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात मानसा गावातील अकालिया येथील २४ वर्षीय अग्निवीर जवान लवप्रीत सिंग शहीद झाला आहे. त्याच्या कुटुंबाप्रती मनापासून संवेदना व्यक्त करतो. आपल्या देशासाठी शूर सैनिकाच्या धैर्याला आणि धैर्याला मनापासून सलाम. या संकटाच्या काळात पंजाब सरकार कुटुंबासोबत आहे आणि आश्वासन दिल्याप्रमाणे शक्य ती सर्व मदत केली जाईल. आमच्यासाठी, आमचे सैनिक हे आमचे सन्मान आहेत, जरी ते अग्निवीर योद्धे असले तरीही," असं मुख्यमंत्री भगवंत मान यांनी म्हटलं आहे.