जम्मू-काश्मीरमधील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण परिसरात दहशत पसरली आहे. दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. या हल्ल्यानंतर, ९० टक्के पर्यटकांनी त्यांचे बुकिंग रद्द केले आहे. पर्यटक काश्मीर खोऱ्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत. सर्वजण विमान पकडून श्रीनगरला पोहोचत आहेत. त्यामुळे स्थानिक लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण आहे. मात्र काही पर्यटक पुन्हा काश्मीरकडे पर्यटनासाठी वळताना दिसत आहेत.
गेल्या काही वर्षांत काश्मीर खोऱ्याचा चेहरामोहरा बदलला आहे. सरकारी प्रयत्नांमुळे इथे पर्यटनाला मोठ्या प्रमाणात चालना मिळाली आहे. मात्र पहलगाममधील हल्ल्यात २६ जणांच्या मृत्यूनंतर, पर्यटन क्षेत्राला मोठा धक्का बसू लागला आहे. काश्मीरमध्ये अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे मोठ्या संख्येने पर्यटक येतात ती ओस पडलेली दिसत आहेत. जम्मू आणि काश्मीरची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात पर्यटनावर अवलंबून आहे. हल्ल्यानंतर हॉटेल, रेस्टॉरंट्स, टॅक्सी आणि पोनी ऑपरेटरसह स्थानिक व्यवसायांवर परिणाम झाला आहे. या हल्ल्यानंतर, व्यवसायात सुमारे ३० ते ५० टक्क्यांनी घट झाली आहे.
असं असले तरी काही पर्यटक पुन्हा जम्मू काश्मीकडे वळले आहेत. वेगळं उदाहरण तयार करण्यासाठी आता पर्यटक केवळ खोऱ्यात येत नाहीत तर गुलमर्ग आसह आता पहलगामकडेही वळत आहेत. शनिवारी, गेल्या तीन दिवसांपासून ओसाड असलेले पहलगाम खोरे पुन्हा एकदा पर्यटकांमुळे गजबजलेले पाहायला मिळाले. देशाच्या विविध भागातील पर्यटकांनी पहलगाम खोऱ्यात पाऊल ठेवले आणि निसर्गरम्य अशा दृश्यांचा आनंद घेतला. महाराष्ट्रातील एका जोडप्याने त्यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करत इथलं वातावरण सामान्य होत असल्याचा संदेश दिला. तसेच इतर लोकांनाही त्यांनी इथल्या लोकांचे आदरातिथ्य अनुभवण्याचे आवाहन केले आहे.
"लग्नाचा वाढदिवस होता म्हणून आम्ही इथे फिरायला आले आहोत. इथे येऊन खूप छान वाटलं. इथली माणसे खूप चांगली आहेत. इथले लोक खूप चांगले बोलतात, चांगले आदरातिथ्य करतात. आता इथे सर्व सामान्यपणे सुरु आहे. आता इथे कोणतीही अडचण नाहीये. जेव्हा हा हल्ला झाला तेव्हा आम्ही श्रीनगरमध्येच होतो. त्यावेळी आम्ही पहलगामला जाणे रद्द केले होते. पण काल विचार केला की इथे आलो आहोत तर पाहूनच जाऊ. इथे आम्ही सुरक्षित आहोत की नाही हे पाहायला आलो कारण घरी जाऊन सांगू शकू की इथे काय वातावरण आहे. इथे सगळं सुरक्षित असून आपण फिरु शकतो," असे या जोडप्याने म्हटलं.
दरम्यान, शनिवारी सकाळी श्रीनगर आणि इतर जिल्ह्यांतील पर्यटकांची वाहने पहलगामला रवाना झाली. दुपारपर्यंत पहलगाममध्ये निसर्गाचा आनंद घेताना मोठ्या संख्येने पर्यटक दिसले. "बहुतेक पर्यटकांच्या यादीतून पहलगाम बाहेर गेले असावे. पण मी त्या पर्यटकांना सांगतोय की त्यांनी पहलगामला पुन्हा त्यांच्या यादीत घ्या आणि इथे या. घाबरण्यासारखे काही नाही. तुम्ही घरी परत जाल आणि पहलगामला न आल्याबद्दल पश्चात्ताप कराल," असेही एका पर्यटकाने म्हटलं.