पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंत, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला आहे. यातच आता केंद्रातील मोदी सरकारने पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचे आधिकृत यूट्यूब चॅनल भारतात ब्लॉक केले आहे. भारत सरकारने पाकिस्तानते पंतप्रधान शहबाज शरीफ, राष्ट्रपती आसिफ अली झरदारी, मरयम नवाज, बिलावल भुट्टो यांच्यासह पाकिस्तानातील अनेक नेत्यांचे आणि मंत्र्यांचे इंस्टाग्रामही भारतात बॅन केले आहे.
भारत सरकारने हे पाऊल 16 प्रमुख पाकिस्तानी यूट्यूब चॅनल्सवर बंदी घातल्यानंतर, उचलले आहे. या यूट्यूब चॅनेल्सवरून भारतीय सैन्य आणि सुरक्षा एजन्सींविरुद्ध प्रक्षोभक आणि सांप्रदायिकदृष्ट्या संवेदनशील कंटेन्टसह खोटे आणि दिशाभूल करणारे व्हिडिओ दाखवले जात होते.
पाकिस्तानी क्रिकेटर्सचे इंस्टाग्राम अकाउंट भारतात ब्लॉक -तत्पूर्वी, भारत सरकारने पाकिस्तानातील अनेक सेलिब्रिटींच्या सोशल मीडिया अकाउंटवर डिजिटल स्ट्राइक केला होता. यात काही क्रिकेटर्सचाही समावेश आहे. भारताने शुक्रवारी (2 मे 2025) बाबर आझम, मोहम्मद आमिर, नसीम शाह, शाहीन अफरीदी, मोहम्मद रिझवान, हॅरिस रऊफ आणि इमाम उल हक यांचे इंस्टाग्राम अकाउंट ब्लॉक केले आहेत.
दिशाभूल करणाऱ्या कंटेंटमुळे अनेक YouTube चॅनेल करण्यात आले ब्लॉक -भारताने बंदी घातलेल्या यूट्यूब चॅनलमध्ये डॉन, समा टीव्ही, एआरवाय न्यूज, बोल न्यूज, रफ्तार, जिओ न्यूज आणि सुनो न्यूज या प्रमुख पाकिस्तानी वृत्तवाहिन्यांचे यूट्यूब चॅनेल्स समाविष्ट आहेत. याशिवाय पत्रकार इर्शाद भट्टी, आस्मा शिराजी, उमर चीमा आणि मुनीब फारूख यांच्या यूट्यूब चॅनेलवरही बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय, द पाकिस्तान रेफरन्स, समा स्पोर्ट्स, उजैर क्रिकेट आणि रझी नामा यासारख्या यूट्यूब हँडलवरही बंदी घालण्यात आली आहे.