चंद्रशेखर बर्वे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली:अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के टॅरिफ लादल्यानंतर भारतानेही अमेरिकेला जबरदस्त धक्का दिला आहे. अमेरिकेकडून एफ-३५ स्टिल्थ फायटर जेट खरेदी करण्याचा इरादा नसल्याचा संदेश भारताने अमेरिकेला दिला आहे.
अमरावतीचे काँग्रेस खासदार बलवंत वानखेडे यांनी विचारलेल्या अतारांकित प्रश्नाला लोकसभेत उत्तर देताना परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंह यांनी सांगितले की, पाचव्या पिढीचे ‘एफ-३५’ हे लढाऊ विमान खरेदी करण्याच्या मुद्द्यावर अमेरिकेसोबत अद्याप कोणत्याही प्रकारची औपचारिक चर्चा झालेली नाही.
युद्धसामुग्री खरेदीचा इरादा नाही, अमेरिकेला कळविले
माध्यमातील वृत्तांनुसार, एवढ्यात कोणत्याही प्रकारची युद्धसामुग्री खरेदी करण्याचा भारताचा इरादा नसल्याचे व्हाईट हाऊसला कळविले आहे. सोबतच, शस्त्रास्त्रांचा संयुक्त विकास, तंत्रज्ञानाचे हस्तांतरण, उत्पादन आणि संरक्षण खरेदी यास आत्मनिर्भरतेला प्राधान्य दिले जाणार असल्याचेही अमेरिकेला सांगण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात १३ फेब्रुवारी २०२५ रोजी बैठक झाली होती. यानंतर जारी केलेल्या संयुक्त निवेदनात ‘अमेरिका भारताला एफ-३५ लढाऊ विमान आणि सागरी प्रणाली देण्यासाठी आपल्या धोरणाचा फेरविचार करेल’, असे म्हटले होते.