ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 14 - भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या फाशीला आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेल्या स्थगितीमुळे भारत आणि पाकिस्तान 18 वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय न्यायालयात (इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस) समोरासमोर आले आहेत. कुलभूषण जाधवप्रकरणी भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे दरवाजे ठोठावले असून, न्यायालयानंही जाधव यांच्या फाशीला स्थगिती दिली आहे. तर 18 वर्षांपूर्वी पाकिस्ताननं भारताविरोधात या न्यायालयात दाद मागितली होती.18 वर्षांपूर्वी पाक नौदलाच्या ताफ्यातील एक विमान भारतानं पाडल्याचा आरोप करत पाकने भारताविरुद्ध आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे दरवाजे ठोठावून त्यांना हस्तक्षेप करण्याची विनंती केली होती. मात्र त्यावेळी न्यायालयानं पाकिस्तानची ती मागणी धुडकावून लावली होती. आंतरराष्ट्रीय न्यायालयानं कुलभूषण यांच्या फाशीला स्थगिती दिल्यानं भारताला कुलभूषण जाधव प्रकरणीही न्याय मिळण्याची आशा आहे.हॉलंडमधल्या हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयात (इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टीस-आयसीजे) या प्रकरणी सुनावणी होणार आहे. कुलभूषण जाधव यांच्याबाबत भारत आणि पाकिस्तान या दोन्ही पक्षकारांची बाजू येथे ऐकून घेणार आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय न्यायालय जाधवप्रकरणी निर्णय देणार आहे. भारताने 8 मे रोजी आंतरराष्ट्रीय न्यायालयात याचिका दाखल करून जाधवप्रकरणी दाद मागितली होती. जाधव यांच्याशी संपर्क साधण्यासाठी भारताने पाकिस्तानकडे केलेले 16 विनंती अर्ज पाकिस्ताननं फेटाळून लावल्याचंही या याचिकेत म्हटलं आहे. त्यामुळे व्हिएन्ना कराराचे उल्लंघन झाल्याचा ठपका आंतरराष्ट्रीय न्यायालयानं ठेवला आहे. जाधव यांच्या कुटुंबातील सदस्यांनी व्हिसासाठी केलेल्या अर्जावरही पाकने कोणताच प्रतिसाद न दिल्याचंही भारतानं आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं आहे.
18 वर्षांनंतर जाधवांच्या निमित्तानं भारत-पाक एकमेकांसमोर उभे ठाकणार
By admin | Updated: May 14, 2017 19:03 IST