ऑनलाइन टीम
मुंबई, दि. २४- मुंबईतील आयपीएस अधिकारी सुनील पारस्कर यांच्यावर एका मॉडेलने लैंगिक शोषणाचे आरोप केल्याने खळबळ माजली आहे. पारस्कर यांनी एका हॉटेलमध्ये नेऊन वारंवार लैंगिक शोषण केल्याचे या मॉडेलने तक्रारीत म्हटले असून याप्रकरणी पारस्कर यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याचे वृत्त आहे.
आयपीएस अधिकारी सुनील पारस्कर यांना नुकतीच नागरी हक्क संरक्षण विभागाच्या पोलिस महासंचालकपदी बढती मिळाली होती. पारस्कर हे त्यापूर्वी मुंबईच्या उत्तर विभागाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त म्हणून कार्यरत होते. कामानिमित्त या मॉडेलची पारस्कर यांच्याशी ओळख झाली. पारस्कर यांनी पिडीत मॉडेल तरुणीला मदतीचे आश्वासन देऊन तिचे लैंगिक शोषण केले. पारस्कर यांनी मदतीचे आश्वासन देऊन मला वारंवार हॉटेलमध्ये नेले व तिथे माझ्यावर बलात्कार केला असे या तरुणीने तक्रारीत म्हटले आहे. या घटनेचे माझ्याकडे पुरावेही आहेत असे पिडीत तरुणीचे म्हणणे आहे. याप्रकरणी मॉडेलने मालवणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून गुन्ह्याची चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र आयपीएस अधिका-यावरच लैंगिक शोषणाची आरोप झाल्याने पोलिस दलाची नाचक्की झाली आहे.