महाराष्ट्रात जशी लाडकी बहीण योजना आहेत, तशीच योजना छत्तीसगडमध्येही आहे. या योजनेमार्फत सरकार दरमहिन्याला सनी लिओनीच्या नावाने पैसे देत असल्याचा प्रकार समोर आला. महतारी वंदन योजनेसाठी सनी लिओनीच्या नावाने अर्ज भरण्यात आला होता आणि त्या खात्यावर पैसेही सरकारकडून जमा केले गेले. पडताळणीत हा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत आरोपीला अटक केली.
अभिनेत्री सनी लिओनीच्या नावाने अर्ज भरून पैसे लाटणाऱ्याला पोलिसांनी अटक केली. महतारी वंदन योजनेतंर्गत अर्ज दाखल करून आरोपी प्रत्येक महिन्याला हजार रुपये घेत होता. ही बाब जेव्हा प्रशासनाच्या निदर्शनास आले, तेव्हा याची चौकशी करण्यात आली.
बस्तरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदार आणि महिला आणि बाल विकास विभागाच्या अधिकाऱ्यांच्या टीमला तालुर गावात पाठवले. अधिकाऱ्यांच्या चौकशी हा सगळा प्रकार उघडकीस आला.
सनी लिओनीच्या नावाने कसा दाखल केला अर्ज?
अंगणवाडी सेविका वेदमती जोशी यांच्याकडून हा अर्ज भरला गेला होता. या नोंदणीकृत अर्जासोबत विरेंद्र जोशी याने त्याचे आधार आणि बँक खाते क्रमांक दिला होता. पण, नाव अभिनेत्री सनी लिओनीचे टाकले होते.
या प्रकरणाबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, अंगणवाडी सेविका वेदमती जोशी यांच्या खात्यावरून हा अर्ज भरला गेला आणि विरेंद्र जोशीने फसवणूक करून अर्ज दाखल केला आणि पैसे लाटले.
सरकारची फसवणूक करून आरोपी महतारी वंदन योजनेचे पैसे घेत राहिला. या प्रकरणी प्रशासनाने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. यात अन्य लोकांचीही नावे समोर आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
या प्रकारावरून काँग्रेसचे छुत्तीसगडचे प्रदेशाध्यक्ष दीपक बैज यांनी सरकारला लक्ष्य केले. सरकारी योजनेतील फसवणुकीच्या प्रकाराबद्दल केलेल्या टीकेला भाजपकडून उत्तर दिले गेले.