जबलपूर : कथितरीत्या राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या (एनसीईआरटी) इयत्ता तिसरीच्या पुस्तकात पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ हे ‘महापुरुष’ असल्याचे म्हटले आहे. मध्य प्रदेशात हा प्रकार उघडकीस आला आहे. यानंतर जबलपूर बार असोसिएशनने यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवली असून हे पुस्तक रद्द करण्याची तसेच प्रकाशक व लेखकाविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे.एनसीईआरटीच्या तिसऱ्या वर्गाच्या ‘मूल्य शिक्षण, सामान्य ज्ञान आणि योग’ या विषयाच्या पुस्तकात मुशर्रफ यांना ‘महापुरुष’ संबोधले आहे. दिल्लीच्या गायत्री पब्लिकेशनने प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचे लेखक पंकज जैन आहेत. गायत्री पब्लिकेशनचे कार्यालय दिल्लीच्या अशोक विहार येथे असल्याचे पुस्तकात नमूद आहे. पुस्तकातील दुसऱ्या विभागातील आठव्या धड्यात मुशर्रफ, सोनिया गांधी, दलाई लामा यांच्यासह सहा छायाचित्रे दिली आहेत. यातून महापुरुषास ओळखण्यास सांगितले आहे.एकीकडे व्यापमं घोटाळा गाजत असताना मध्य प्रदेशातील अशा प्रकारची बौद्धिक दिवाळखोरी उघडकीस आल्याने विरोधकांच्या हाती आयते कोलित आले आहेत. (प्रतिनिधी)
एनसीईआरटीच्या मते मुशर्रफ महापुरुष!
By admin | Updated: July 19, 2015 23:30 IST