नवी दिल्ली : ‘आप’ आणि त्याचे प्रमुख अरविंद केजरीवाल हे खाप पंचायत असल्याचा घणाघाती हल्ला शांती भूषण व प्रशांत भूषण यांनी केला. दरम्यान, लोक चळवळ सक्रिय व जिवंत ठेवण्यासाठी ‘नवा आदर्श’ शोधण्याचे काम सुरू ठेवून लोकांशी जोडण्याचे प्रयत्न केले जातील, असे आम आदमी पार्टीतून हकालपट्टी झालेले ज्येष्ठ नेते योगेंद्र यादव यांनी मंगळवारी येथे सांगितले. आम आदमी पार्टीने ज्येष्ठ नेते व राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य प्रशांत भूषण, योगेंद्र यादव, अजित झा व धरमवीर गांधी यांची हकालपट्टी केली.बंडखोरांची हकालपट्टी करणारा आम आदमी पार्टी आणि पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल हे ‘खाप पंचायत’ आहे, अशा तीव्र शब्दांत प्रशांत भूषण आणि त्यांचे वडील शांती भूषण यांनी हल्ला केला. शांती भूषण हे एकवेळ आपचे आश्रयदाते समजले गेले होते. त्यांनी केजरीवाल यांची तुलना अॅडोल्फ हिटलर यांच्याशी केली. कार्यपद्धतीबद्दल अनादरसंस्था व तिच्या कार्यपद्धतीबद्दल भूषण आणि यादव यांना आदर नसल्याची टीका आम आदमी पार्टीने केली आहे. भूषण व यादव यांची पक्षातून हकालपट्टी झाल्यावर या दोघांनी पक्षाच्या राष्ट्रीय शिस्तपालन समितीवर टीका केली होती. भूषण व यादव हे पक्षाला हानिकारक ठरतील अशा कृत्यांमध्ये गुंतले होते, असे सांगून या बंडखोरांच्या हकालपट्टीच्या निर्णयाचे ‘आप’ने समर्थन केले. माजी पत्रकार आशिष खेतान यांनी ‘ठरवून’ बातमी तयार केली व तिचा लाभ खासगी कंपनीला झाला, असा आरोप प्रशांत भूषण यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर ‘आप’ने खेतान यांना पाठिंबा दिला आहे. तक्रारदारच न्यायाधीशशिस्तपालन समितीमध्ये पंकज गुप्ता आणि आशिष खेतान यांच्या उपस्थितीला भूषण व यादव यांनी आक्षेप घेतला होता. गुप्ता व खेतान यांनी बंडखोरांवर हल्ले केले होते व ‘तक्रारदारच’ ‘न्यायाधीश’ कसा असू शकतो, असे यादव व भूषण यांनी म्हटले होते.(लोकमत न्यूज नेटवर्क)
‘आप’ नव्हे तर खाप
By admin | Updated: April 22, 2015 02:41 IST