नवी दिल्ली : वक्फ सुधारणा विधेयकाच्या घटनात्मक वैधतेला आम आदमी पक्षाचे (आप) आमदार अमानतुल्ला खान यांनी, तसेच असोसिएशन फॉर दी सिव्हिल राईट्स (एपीसीआर) या स्वयंसेवी संस्थेने स्वतंत्र याचिकांद्वारे सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. याआधी काँग्रेसने व एआयएमआयचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनीही सदर विधेयकाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
अमानतुल्ला खान यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे की, वक्फ सुधारणा विधेयक हे घटनाबाह्य व राज्यघटनेतील १४, १५, २१, २५, २६, २९, ३० व ३००-अ या कलमांमुळे मिळालेल्या मूलभूत हक्कांचा भंग करणारे आहे. त्यामुळे हे विधेयक रद्द करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने द्यावा, अशी विनंती त्यांनी केली आहे.
'मुस्लिमांच्या धार्मिक बाबींमध्ये होतोय हस्तक्षेप'असोसिएशन फॉर दी सिव्हिल राईट्स (एपीसीआर) या संस्थेने आपल्या याचिकेत म्हटले आहे की, वक्फ सुधारणा विधेयक मुस्लीम समुदायाच्या धार्मिक बाबींमध्ये हस्तक्षेप करत आहे. वक्फ या संकल्पनेशी विसंगत अशा तरतुदी या विधेयकात आहेत.