झारखंडमधील धनबाद रेल्वे रुग्णालयामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे रुग्णालयात शस्त्रक्रिया सुरू असताना फॉल्स सिलिंग तुटून एक कुत्रा थेट ऑपरेशन थिएटरमध्ये पडला. या घटनेमध्ये ऑपरेशन थिएटरमध्ये असलेला रुग्ण, डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी थोडक्यात बचावले. मात्र एका कर्मचाऱ्याला किरकोळ दुखापत झाली.या घटनेबाबत प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, सदर कुत्रा हा आतील हवा खेळती राहण्यासाठी छतावर लावण्यात आलेल्या व्हेंटिलेटरमधून सिलिंगपर्यंत पोहोचला. सतत पाऊस पडत असल्याने कुत्र्याचं वजन फॉल्स सिलिंगला पेलवलं नाही. त्यामुळे ते तुटून खाली कोसळले. सुदैवाने हा कुत्रा ऑपरेशन थिएटरच्या मधोमध पडला. त्यामुळे आजूबाजूला असलेल्यांना काही दुखापत झाली नाही. तसेच तिथे शस्त्रक्रिया झालेला रुग्णही सुरक्षित राहिला.
या घटनेनंतर रुग्णालयातील अभियांत्रिकी विभागाच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यामध्ये व्हेंटिलेशन एरियाजवळूनच फॉल्स सिलिंग केली असल्याचे आढळून आले,. त्यामुळे कुत्र्यांना आत शिरण्यासाठी वाट तयार झालेली होती. अधिकाऱ्यांनी रुग्णालयाच्या इमारतीवर वारंवार कुत्रे चढत असल्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. तसेच त्यावर लवकरच तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं आहे.
दरम्यान, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी सांगितले की, रुग्णालयाच्या छतावर कुत्र्यांच्या झुंडी वारंवार दिसून येतात. पावसाळ्याच्या दिवसात हे कुत्रे लपण्यासाठी व्हेंटिलेटरमधून फॉल्स सिलिंगच्या आत येतात. त्यामुळे रुग्ण आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.